Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पुण्यातील मुठा नदीच्या पूर रेषेत धक्कादायक बदल

बांधकाम व्यावसायिकांच्या हिताखातर खटाटोप

पुण्यातील मुठा नदीच्या पूर रेषेत धक्कादायक बदल

अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : पुण्यातील मुठा नदीच्या पूर रेषेत धक्कादायक बदल करण्यात आल्याचं समोर आलं आहे. या बदलांमुळे भविष्यात पुण्यामध्येही सांगली, कोल्हापूर सारखी पूर परिस्थिती उद्भवू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या हिताखातर हा खटाटोप होत असल्याचा आरोप होतो आहे.

खडकवासला धरणातून जेमतेम ४५ हजार क्युसेक्सनं पाणी सोडताच पुणे शहराची कशी दैना उडाली. हे गेल्या काही दिवसांत पाहायला मिळालं. विठ्ठलवाडी, पुलाची वाडी, मंगळवार पेठ, संगमवाडी, येरवडा अशा अनेक वसाहतींमध्ये पुराचं पाणी शिरलं.

मात्र हे केवळ भविष्यात येवू घातलेल्या भीषण संकटाचं इवलुसं प्रात्यक्षिक आहे. त्याचं कारण म्हणजे मुठा नदीच्या पूररेषेत करण्यात आलेले धक्कादायक बदल. जलसंपदा विभागानं २०११ मध्ये निश्चित केलेल्या निळ्या तसेच लाल पूररेषा २०१६-१७ मध्ये मनाला वाटेल तशा पद्धतीनं मागे- पुढे सरकावण्यात आल्या आहेत. पुलाची वाडी, संभाजी उद्यान, संगमवाडी, सिंहगड रस्ता परिसरात या रेषांमध्ये किमान ३० मीटर ते कमाल ८० मीटर इतके बदल करण्यात आलेत.

नदीची पूररेषा बदलण्याचा प्रकार महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्या संगनमतातून झाल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप आहे. पूररेषा बदलून बांधकाम व्यावसायिकांना इमारती उभारण्यासाठी नदीकाठाचं रान मोकळं करून देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. सत्ताधारी भाजपनं मात्र हा आरोप फेटाळलाय. 

भविष्यातलं संकट टाळायचं असेल तर आधीच्या संकटातून धडा घ्यायलाच हवा.

Read More