Jalgaon News: जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पाळधी गावातील रघुनाथ खैरनार हे आजोबा दोन दिवसांपासून बेपत्ता झाले होते. अशातच त्यांच्या कुटुंबाने त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु ते सापडले नाहीत. त्याचवेळी पाळधी गावात असणाऱ्या रेल्वे ट्रॅक जवळ एक अनोळखी मृतदेह आढळतो. त्यावेळी स्थानिक रेल्वे गार्ड व इतर व्यक्तींकडून खैरनार कुटुंबाशी संपर्क केला जातो. खैरनार कुटुंब घटनास्थळी जाऊन मृतदेहाची ओळख पटवतात.
मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर ते शवविच्छेदनासाठी पाठवतात. हे सुरु असतानाच इकडे गावात रघुनाथ खैरनार यांच्या अंत्यसंस्काराची तयारी केली जाते. त्यांचा मृत्यू झाल्याचे सर्व नातेवाईकांना कळवण्यात येते. पाळधी गावात त्यांच्या अंत्यासंस्कारासाठी नातेवाईक जमलेले असतात आणि त्याच वेळी रघुनाथ खैरनार हे चक्क पायी चालत आपल्या घरी येताना दिसतात. हे दृश्य पाहून त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या नातेवाईकांना आणि गावकऱ्यांना एकच धक्का बसतो.
रेल्वे ट्रॅक जवळ आढळलेला मृतदेह कोणाचा?
पाळधी गावात असणाऱ्या रेल्वे ट्रॅक जवळ आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटवताना झालेल्या गफलतीमुळे हा सर्व गोंधळ झाला. रेल्वे ट्रॅक जवळ आढळलेला मृतदेह आणि रघुनाथ खैरनार यांच्या चेहऱ्यात असलेले साम्य, सारखेच कपडे आणि हात देखील सारखेच असल्यामुळे गोंधण उडाला. यामुळे हा मृतदेह रघुनाथ खैरनार यांचाच आहे असा समज खैरनार कुटुंबियांचा होता.
त्यांच्याकडून ओळख पटवली जाते आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला जातो. इकडे घरी अंत्यसंस्काराची तयारी देखील पूर्ण केली जाते नातेवाईक व गावकरी जमतात. मात्र रघुनाथ खैरनार हे स्वतः पाई चालत घरी आल्याने शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेला तो मृतदेह नेमका कोणाचा? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. सध्या या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, रघुनाथ खैरनार यांची मानसिक स्थिती चांगली नसल्याने ते अनेकदा घरातून निघून जातात. याआधी देखील ते अनेकदा निघून गेले असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे. सध्या रेल्वे ट्रॅक जवळ आढळलेला मृतदेह कोणाचा आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.