Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

आफ्रिका टू मुरुड व्हाया अलिबाग... समुद्रकिनाऱ्यावरील डोंगरकड्यावर असलेला तो भव्य महाल कोणाचा?

Raigad District History : कोकणातील समुद्रकड्यावर आहे एक असा महाल, ज्याचा थेट सिद्दी राजवटीशी संबंध; पाहा कुठंय ये ठिकाण

आफ्रिका टू मुरुड व्हाया अलिबाग... समुद्रकिनाऱ्यावरील डोंगरकड्यावर असलेला तो भव्य महाल कोणाचा?

Raigad District History : भारताच्या, किंबहुना एकट्या महाराष्ट्राच्या इतिहासात डोकावून पाहिलं असता असे काही संदर्भ आढळतात की वेळोवेळी हे संदर्भ भारावून सोडतात आणि कैक प्रश्न मनात घर करून जातात. अशाच इतिहासप्रेमींसाठी रायगड जिल्ह्यातील मुरुड हे एक उत्तम ठिकाण. अलिबागपासून (Alibaug) तास, दीड तासाच्या अंतरावर असणाऱ्या या ठिकाणी आलं असता अथांग समुद्रात मध्यावरच उभा असणारा आणि लाटांचा मारा सोसणारा अभेद्य मुरूड जंजिरा या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकासाठीच एक पर्वणी. 

जंजिरा किल्ल्यासोबतच इथं एक अशी एक अप्रतिम वास्तूसुद्धा इतिहासाची साक्ष देत शतकभरापासून इथंच उभी आहे. समुद्रकिनाऱ्याला लागून असणाऱ्या डोंगरकड्यावर असणारी ही वास्तू आहे पॅलेस ऑफ नवाब. सिद्दी पॅलेस अशी त्याची मूळ ओळख आणि आताचं नाव अहमदगंज पॅलेस. 

45 एकर इतक्या विस्तीर्ण भूखंडावर उभा असणारा हा भव्य महाल 1885 मध्ये सिद्दी राजवटीकडून उभारण्यात आला आणि तेव्हापासून आतापर्यंत हा महाल येणाऱ्या जाणाऱ्यांच्या मनात विशेष स्थान मिळवून जात आहे. 

कोण होते हे सिद्दी? 

मूळच्या आफ्रिकेतील व्यापारी असणाऱ्या या सिद्दींनी जंजिरावर जवळपास 500 वर्षे (1489-1947) राज्य केलं. त्यांच्याच अस्तित्वाची साक्ष देणारा हा महाल, मुघल आणि गॉथिक स्थापत्यकलेचा एक अप्रतिम नमुना. जंजिऱ्याच्या नवाबानं हा महाल उभारण्यात आला असून, येथील कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी त्याची निर्मिती करण्यात आली होती. महालाला असणाऱ्या नक्षीदार कमानी, भिंती आणि खिडक्यांवर असणारं कोरीवकाम महालाचं सौंदर्य आणखी खुलवतात. जवळपास 110 कारागिराच्या मेहनतीनं हा महाल सजला असून, यासाठीचा कच्चा माल इथं मुरूडपर्यंत घोडे आणि बैलगाड्यांवर आणला गेल्याचं सांगितलं जातं. 

हेसुद्धा वाचा : शाप की निसर्गाची अवकृपा? एक असं गाव जिथं कधीच पाऊस पडला नाहीय, कसे दिवस काढतात गावकरी? 

अहमदगंज या आलिशान महालात 50 खोल्या असून, त्यामध्ये अनेक बँक्वेट हॉलसुद्धा आहेत. इतकंच नव्हे, तर एक लहानसं संग्रहालय, डायनिंग रुम अशी दालनंसुद्धा इथं आहेत. अद्यापही या महालाची मालकी जंजिऱ्याच्या नवाबांच्या वंशजांकडे असल्यामुळं या खासगी मालकीमुळं बाहेरील व्यक्तींना महालात प्रवेश निषिद्ध आहे. असं असलं तरीही महालाच्या प्रवेशद्वारापाशी उभं राहून त्याचं सौंदर्य न्याहाळणारे अनेकजण इथं पाहायला मिळतात. 

इथवर कसं पोहोचावं? 

मुंबईतून रस्ते मार्गानं किंवा समुद्राच्या मार्गानं इथं पोहोचता येतं. गेटवे ऑफ इंडियावरून सुटणाऱ्या मांडवा जेट्टीपर्यंतच्या बोटीनं आल्यानंतर पुढं अलिबाग, रेवदंडा आणि त्यानंतर मुरूड असे टप्पे गाठत हा महाल पाहण्यासाठी पोहोचता येतं. अलिबागनंतर नारळीपोफळीच्या बागांतून आणि समुद्र किनाऱ्याला लागून जाणाऱ्या वाटेनं इथं पोहोचल्यानंतर समोर दिसणारा हा महाल एका क्षणात प्रवासाचा क्षीण घालवतो. 

fallbacks

इथं आलं असता मुरूज जंजिरा किल्ला, पद्मदुर्ग, गारंबी धरण, कोर्लई किल्ला, कुडे लेणी अशी ठिकाणंही तुम्ही पाहू शकता. इतकंच नव्हे, तर विस्तीर्ण समुद्राच्या काठावर बसून कैक तास या ठिकाणचं सौंदर्य न्याहाळू शकता. 

Read More