Ahmedabad plane crash : मागच्या 6 महिन्यात देशात 6 मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. गुरुवारी अहमदाबादमध्ये भीषण दुर्घटना घडली. या घटनेत विमानातील प्रवाशांबरोबर अहमदाबादमधील मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा देखील मृत्यू झालाय. कारण अहमदाबादच्या विमानतळावरून उड्डान घेतल्यानंतर काही सेकंदातच हे विमान मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळलं. या हृदयद्रावक घटनेत 24 विद्यार्थ्यांनी देखील आपला जीव गमावलाय. दरम्यान ही दुर्घटना कशामुळे झाली याचं कारण विमानामधील ब्लॅक बॉक्समधून समोर येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील आज घटनास्थळी जात परिस्थितीचा आढावा घेतलाय. तसंच जखमी
नागरिकांची देखील मोदींनी भेट घेतली आहे.
या 6 महिन्यातील दुसरी सर्वात मोठी दुर्घटना म्हणजे मुंबई लोकल
9 जून रोजी मुंब्रा स्टेशनजवळ लोकलमधून पडून 4 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. कसाराहून सीएसएमटीकडे जाणारी लोकल आणि सीएसएमटीकडून कल्याणकडे जाणारी लोकल मुंब्रा स्टेशनपासून काही अंतरावर एकमेकांवर जवळ आल्यात. दरम्यान या दोन्ही लोकलमधलं अंतर कमी असल्यामुळे कसारा लोकल आणि कल्याण लोकलच्या दरवाजाजवळ उभे असेलेल प्रवासी एकमेकांवर आदळल्यानं ते लोकल खाली पडले आणि यात त्यांचा मृत्यू झाला.
याच महिन्यात बंगळुरूमध्ये देखील मोठी दुर्घटना घडली होती
17 वर्षानंतर विराट कोहलीच्या आरसीबीनं आयपीएलच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय. दरम्यान यानंतरच आरसीपीच्या विजयी आनंदावर दु:खाचं विरजन पडलं. आयपीएल जिंकल्यानंतर दुस-या दिवशीच म्हणजे 5 जूनला बंगळुरूमध्ये आरसीबीच्या संघाचा कर्नाटक सरकारकडून सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान जो पहिले येईल त्याला चिन्नास्वामी स्टेडियममध्ये एन्ट्री मिळणार असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे या स्टेडियमबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान हीच गर्दी पांगवतांना स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली आणि या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला होता. तर जवळपास 35 जण हे जखमी झाले होते.
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला
22 एप्रिलला पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या घटनेत 26 पर्यटकांनी आपला जीव गमावला होता. दहशतवाद्यांनी धर्म विचारून या पर्यटकांवर गोळीबार केला होता. तसंच मोदींना जाऊन सांगा असंही दहशतवाद्यांनी एका महिलेला सांगितलं होतं. दरम्यान या घटनेनंतर भारतानं ऑपरेश सिंदूर राबवलं आणि पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांना खात्मा केला. दहशतवाद्यांच्या 9 तळांवर भारतानं एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. दरम्यान यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
दिल्ली रेल्वे स्टेशनवरील चेंगराचेंगरी
16 फेब्रुवारी रोजी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल 18 जणांनी आपले प्राण गमावले होते. कुंभमेळ्यासाठी प्रयागराजला जाणा-या दोन रेल्वे कॅन्सल करण्यात आल्या होत्या. दरम्यान यानंतर प्लॅटफॉर्मवर मोठी गर्दी झाली होती. तसंच त्यानंतर एका विशेष रेल्वेची देखील घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर गोंधळ उडाला आणि रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली होती.
कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी
दरम्यान या वर्षाची सर्वात मोठी दुर्घटना म्हणजे कुंभमेळ्यात झालेली चेंगराचेंगरी. प्रयागराजच्या कुंभमेळ्यात मोठ्या संख्येने भाविक जमले होते. त्यावेळी चेंगराचेंगरी झाली होती. या चेंगराचेंगरीत जवळपास 800 लोकांचा मृत्यू झाला होता. 29 जानेवारीला मौनी अमावस्येला अमृत स्नान करण्यासाठी संगम किनाऱ्यावर मोठ्या संख्येने भाविक आले. त्यावेळीच ही चेंगराचेंगरी होऊन 800 भाविकांनी आपला जीव गमावला होता.