Ladki Bahin Yojana : राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी पुन्हा एकदा वळवण्यात आला आहे. जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी 410 कोटी रुपयांचा निधी या योजनेसाठी वळवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या निर्णयावरून पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या अगोदरही सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आला होता. त्यानंतर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर उघडपणे टीका केली होती. आता पुन्हा त्यांच्या विभागाचाच मोठा निधी वळवण्यात आल्याने राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची चिन्हं आहेत.
राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेसाठी आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत 3960 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याच योजनेंतर्गत जुलै महिन्याचा आर्थिक लाभ देण्यासाठी 410 कोटी रुपये महिला व बाल विकास विभागाला वितरीत करण्यात आले आहेत.
वित्त विभागाच्या 7 एप्रिल 2025 रोजीच्या परिपत्रकानुसार ही रक्कम लेखाशिर्षा 2235D767 अंतर्गत वितरित करण्यात आली आहे. सदर निधी काटकसरीने आणि शासकीय मार्गदर्शक तत्वांनुसार खर्च करण्याचे निर्देश नियंत्रक अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
महिला व बाल विकास विभाग, समाजकल्याण विभाग, तसेच प्रादेशिक उप आयुक्तांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत निधी वापराचा तपशील, उद्दिष्टपूर्तीची माहिती आणि उपयोगिता प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
विशेष बाब म्हणजे, अनुसूचित जाती आणि नवबौद्ध महिलांसाठीच हा निधी वापरण्यावर भर देण्यात आला असून, या घटकांतील महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी संबंधित विभागांनी विशेष काळजी घ्यावी असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
तसेच, संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा निवृत्तीवेतन योजना अंतर्गत लाभ घेत असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा दुबार लाभ मिळणार नाही. याचीही स्पष्ट सूचना महिला व बाल विकास विभागाला देण्यात आली आहे.