Solapur News: आई बाळाला 9 महिने आपल्या पोटात वाढवते, लहानाचं मोठं करते, चांगले संस्कार करते पण हीच मुलं मोठी झाल्यावर आईला वाईट वागणूक देत असतील तर त्यापेक्षा दुर्देवी असं काही नाही. जन्मदात्या आईचा मृतदेह समोरून गेला मात्र अंत्यसंस्कारासाठी 8 मुली अन् सख्खा भाऊ पुढे आला नाही.
सोलापुरातील मोहोळ तालुक्यात हा संतापजनक प्रकार समोर आला. जन्मादाती आई आणि मुलींच्या नात्यातील मायेचा ओलावा आटल्याचे या घटनेत साऱ्यांना पाहायला मिळाले. भिमाबाई नागनाथ चटके असे या मृत दुर्दैवी आईचे नाव असून त्या 75 वर्षांच्या होत्या. मुलींनी आईच्या मृतदेहाकडे पाठ का फिरवली? आईचे अंत्यसंस्कार करु नये, असे त्यांना का वाटले? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
मृत्यूमुखी पावलेल्या आईच्या वाट्याला 8 एकर जमिन आली. आईला ऐकता येत नव्हते तसेच ती दृष्टीबाधितही झाली होती. अशा स्थितीत आईची काळजी घ्यायची सोडून मुलींनी तिले एका मंदिरात सोडून दिले होते. याहून संतापजनक म्हणजे मुलींनी आईच्या वाट्याला असलेली 8 एकर इस्टेट वाटून घेतली होती.
अशा परिस्थितीत दुर्देवी आईला कोणी संभाळलं, कोणी तिच्यावर अंत्यसंस्कार केले? असे प्रश्न उपस्थित होतात. मोहोळ तालुक्यातील मोरवंची येथील प्रार्थना फाउंडेशनच्या प्रसाद मोहिते आणि अनु मोहिते या दाम्पत्याने आपल्या अनाथ आश्रमात या आज्जीना सांभाळले. भिमाबाई या मोहिते दाम्पत्याच्या अनाथ आश्रमात राहत होत्या.
मात्र 2 एप्रिल रोजी त्यांचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला. यावेळी भिमाबाईंच्या 8 मुली अन् सख्खा भाऊ आश्रमात आले. मात्र एकानेही अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेतला नाही उलट 8 पैकी 5 मुलींनी आणि भावाने तेथून काढता पाय घेतला. तर उर्वरित 3 मुलींनी अंत्यसंस्काराचे काय ते तुम्हीच बघा असे म्हणत घरची वाट पकडली धक्कादायक बाब म्हणजे वडिलांच्या निधनानंतर आईच्या वाट्याची 8 एकर जमीन सर्व बहिणींनी वाटून घेतली मात्र आईचा सांभाळ एकीनेही केला नाही. प्रार्थना फाउंडेशनचे संचालक प्रसाद मोहिते यांनी यासंदर्भात माहिती दिली. या घटनेमुळे जन्मादाती आई आणि मुलींच्या नात्यातील ओलावा आटल्याने पाहायला मिळाले. प्रार्थना फाउंडेशनचे प्रसाद मोहिते यांनी आपल्या सहकाऱ्यां सोबत भीमाबाई चटके यांच्यावर अंत्यसंस्कार केले. या घटनेमुळे सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्देवी घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय.