Solapur Crime News: मंगळवेढ्यात कडब्याच्या गंजीत सापडलेल्या मृतदेहाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. दीर-भावजयीने आपले प्रेम प्रकरण लपवण्यासाठी मनोरुग्ण महिलेचा बळी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात.
मंगळवेढा तालुक्यातील पाठखळ येथे किरण सावंत आणि तिचा चुलत दीर निशांत सावंत यांचे प्रेम प्रकरण होते. दोघांना एकत्र संसार करायचा होता. त्यासाठी किरण मृत झाली असा बनाव रचण्यासाठी तिचा प्रियकर निशांत याने एक मनोरुग्ण महिलेला हेरले. तुमच्या मुलाची भेट घालून देतो असे सांगून तिला पाठखळ येथे आणून जीवे मारले यानंतर त्याच मनोरुग्ण महिलेचा मृतदेह जाळून किरणने आत्महत्या केल्याचं भासवले. मात्र पोलिसांनी किरणच्या फोनवरून कोणाला शेवटचा संपर्क झाला हे शोधले असता निशांतचे नाव समोर आले. यामुळे किरण जिवंत असल्याचे गूढ उकलले.
कडब्यात जळालेल्या महिलेबाबत निशांतकडून पोलिसांनी माहिती काढली असता पंढरपूरच्या गोपाळपूरजवळ एक वेडसर महिला तिच्या मुलाच्या शोधात फिरत असल्याचे निशांत याला दिसले. यानंतर त्याने तिला तिच्या मुलाला शोधून देतो असे सांगून पाटखळ येथील सावंत वस्ती येथे घेऊन आला. दोन दिवसापूर्वी तिचा गळा दाबून खून करून घटनेदिवशी या कडब्याच्या गंजीत तिचा मृतदेह ठेवला आणि कडब्याची गंजी पेटवून दिली. यावेळी त्यांनी किरणचा मोबाईल या मृत महिलेच्या अंगावर ठेवला.
रात्री अडीचच्या सुमाराला कडब्याची गंजी पेटवण्यापूर्वी किरण हिला घरातून बाहेर बोलवून डाळिंबाच्या बागेत लपायला सांगितले. यानंतर गंजी पेटवून निशांत निघून गेला. आग भडकलेली पाहताच परिसरातील ग्रामस्थ आग विझवायला आले. यात निशांत ही सामील होता. या गंजीमध्ये एका महिलेचा मृतदेह दिसल्याने किरण हिनेच आत्महत्या केली असे कुटुंबाला वाटले. मात्र किरणच्या मोबाईलवरील कॉलमुळे निशांत आणि किरणचे हे धक्कादायक कांड बाहेर आले.