Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

जिथं आयुष्याची सुरुवात केली तिथचं आयुष्याचा शेवट झाला; सोलापुरात कारखान्याच्या मालकासह कुटुंबातील चौघांचा मृत्यू

सोलापुरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातला सेंट्रल टेक्स्टाईल कारखान्याला भीषण आग लागली. या आगीत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे कारखान्याचे मालक मन्सुरी, आणि त्यांच्या कुटुंबातील चौघे आगीच्या भक्ष्यस्थानी आले

जिथं आयुष्याची सुरुवात केली तिथचं आयुष्याचा शेवट झाला; सोलापुरात कारखान्याच्या मालकासह कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Solapur News : सोलापुरात अक्कलकोट रोडवरच्या टेक्स्टाईल कारखान्यात अग्नितांडव झाले. या आगीत 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीत टेक्स्टाईल कारखान्याचे मालक उस्मान मन्सूरी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील इतर तिघांचा करूण अंत झालाय. सोलापुरात आगीच्या घटना सातत्याने घडत आहे. त्यामुळे उपाय योजनेबाबत आता चर्चा होतीये. तब्बल 10 तासांहून अधिक काळ आग धुमसतच होती. तब्बल 100 पेक्षा अधिक अग्निबंबांचा वापर करत आग आटोक्यात आणण्यात आली.

सोलापुरच्या अक्कलकोट एमआयडीसी परिसरातील टॉवेल तयार करणाऱ्या कारखान्यात पहाटे चारच्या सुमारास आग लागली. कारखान्यातील कच्च्या मालामुळे आग वेगाने पसरत गेली, आणि आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत कारखान्याचे मालक उस्मान मन्सूरी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्य आणि अन्य 4 कर्मचारी असे एकूण 8 जण अडकले होते.

यात मन्सुरी यांच्यासह 8 जणांचा मृत्यू झाला. रेस्क्यू ऑपरेशनच्या दरम्यान 8 मृतदेह बाहेर काढण्यात आले. सदर घटनेत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला असून यापैकी 3 महिला, 4 पुरुष आणि एका वर्षाच्या लहान चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे.
कामगारांना वाचवण्यासाठी कारखान्याची भिंत फोडण्यात आली. आग विझवण्यासाठी जवळपास 100 पेक्षा अधिक अग्निशामक दलाच्या बंबाचा वापर करण्यात आला. या कारखान्यावर अडीचशे ते तीनशे कामगारांची उपजीविका भागत होती.

टेक्स्टाईल कारखान्याच्या आगीच्या घटनेतील मृत व्यक्ती

1) उस्मान मन्सूरी -  वय 87
2) अनस मन्सूरी - वय 24 
3) शीफा मन्सूरी -  वय 24
4) युसुफ मन्सूरी - वय एक वर्ष 
5) आयेशा बागवान - वय 38 
6)  मेहताब बागवान - वय 51 
7)  हिना बागवान - वय 35 
8) सलमान बागवान - वय 38

टेक्स्टाईलला भीषण आग लागल्याची माहिती कळताच भाजपाचे आमदार सुभाष देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिलीय. सातत्याने एमआयडीसीमध्ये अशा घटना घडतायेत...मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्र्यांनी याबाबत उपाययोजना करण्याची मागणी देशमुख यांनी केली आहे.

सोलापुरातील माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी अग्निशमन यंत्रणा वेळेवर आली नाही म्हणत संताप व्यक्त केलाय आणि चौकशीची मागणी केली आहे.  तर या अग्नितांडवाची राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही माहिती घेतली. यावेळी पीडितांना आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. सोलापुरातल्या या आगीच्या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली.

 

Read More