SSC HSC Exam: बोर्डाच्या परीक्षा सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी शिक्षण विभाग आणि बोर्डाचा धाक असतो. परंतु संभाजीनगरमध्ये वेगळाच प्रकार घडलाय.मुलांना कॉपी करू द्या असा पालकांचा शिक्षण विभागावर दबाव असल्याचा उलटा प्रकार घडलाय.यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ माजलीये.
सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत.राज्यात परिक्षेदरम्यान अनेक ठिकाणी कॉपीचा सुळसुळाट पाहायला मिळतोय. कॉपी बहाद्दरांमुळे सरकारच्या कॉपीमुक्त अभियानाचा पुरता फज्जा उडाला आहे.त्यातच संभाजीनगरमध्ये पालकांनीच आमच्या मुलांना कॉपी करू द्या म्हणत शिक्षण विभागावर दबाव टाकलाय...परीक्षा केंद्रावर मुलांना कॉपी करता यावी यासाठी गावकरी परीक्षा केंद्राबाहेर थांबतात. बाहेरचे अधिकारी कसे येतात ते आम्ही पाहतो, असं म्हणत शिक्षण विभागाला ते धमकावताहेत. बारावीच्या परीक्षा सुरू झाल्यापासूनच संभाजीनगरमध्ये कॉपीचे प्रकार सर्रास घडतायेत.त्यात आता कॉपीसाठी संस्था चालक आणि शिक्षकांसोबत पालकांचाही दबाव असल्याचं दिसतंय.
फुलंब्री तालुक्यात बारावीच्या गणित विषयाच्या पेपरवेळी सामूहिक कॉपीचा प्रकार घडला. शिक्षण भरारी पथकाच्या भेटीत कॉपींचा खच आढळला. जीवशास्त्राच्या परीक्षेदरम्यान वैजापूर तालुक्यातही कॉपीची पुनरावृत्ती झाली. शिक्षण संस्थांच्या अध्यक्षांसह 17 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलाय. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सचिव, प्राचार्यांसह पर्यवेक्षकांचाही समावेश आहे. कॉपीसाठी पालकांचा दबाव असला तरी आम्ही पोलीस बंदोबस्तात परीक्षा घेत आहोत आणि कुणाच्याही धमकीला भीक घालणार नाही असा निर्धार शिक्षण विभागाने केला आहे. एरवी मुलांना चांगले गुण मिळावे म्हणून पालकांचा दबाव असतो. मात्र संभाजीनगरमध्ये उलटंच चित्र पाहायला मिळतंय. अभ्यास न करता अशा पद्धतीने विद्यार्थी पास होणार असतील तर त्यांच्या शैक्षणिक क्षमतेवर प्रश्नचिन्हच निर्माण होणार आहे.
जालनातील बदनापूर शहरात चक्क 20 रुपयात दहावीच्या प्रश्नपत्रिका मिळत असल्याचे वृत्त समोर आले आहे. येवल्यातही कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचं चित्र समोर आले. दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी येवल्यातील काही परीक्षा केंद्रांवर कॉपी पुरवण्यासाठी गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. अनेक केंद्रांवर बाहेरून कॉपी पुरवण्यासाठी टवाळखोरांनी गर्दी केली होती.कॉपी पुरवण्यासाठी विरोध करणा-या शिक्षकांना देखील टवाळखोर दमदाटी करत असल्याचे काही शिक्षकांनी सांगितलं. दरम्यान यावेळी झी 24 तासचा कॅमेरा बघताच टवळखोरांची एकच पळापळ झाली. दहावीचा मराठीचा पेपर फुटला नाही. स्थानिक झेरॉक्स दूकानदारांनी आजच्या मराठी विषयाच्या प्रश्न पत्रिकेत न आलेल्या प्रश्नांची झेरॉक्स काढून विक्री केली अशी माहिती जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली. जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. दरम्यान दोषी व्यक्तींवर कारवाई करणार असल्याचे यात सांगण्यात आले. आज काही वृत्त वाहिन्यानी ‘जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरात दहावीचा मराठी विषयाचा पेपर फुटला’ या आशयाचे चूकीचे वृत्त प्रसारित करण्यात आले आहे. परंतू प्रत्यक्षात असा कोणताही प्रकार घडलेला नसुन, स्थानिक झेरॉक्स दूकानदारांनी आजच्या मराठी विषयाच्या प्रश्न पत्रिकेत न आलेल्या प्रश्नांची झेरॉक्स काढून विक्री केली आहे. प्रश्न पत्रिका परिक्षा केंद्राच्या बाहेर आलेली नाही. तथापी याठिकाणी दगडफेक झाली. याबाबत दोषीं व्यक्तीचा शोध घेवून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी कळविले आहे.