Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'सेरेब्रल पाल्सी'वर मात करत त्यानं दहावीत मिळवलं घवघवीत यश

विज्ञानातील 'स्टेम -सेल' थेरेपी या आधुनिक उपचाराचा त्याने जानेवारी महिन्यात स्वतःवर अनुभवही घेतला

'सेरेब्रल पाल्सी'वर मात करत त्यानं दहावीत मिळवलं घवघवीत यश

प्रफुल्‍ल पवार, झी २४ तास, अलिबाग : 'असाध्य ते साध्य करीता सायास' या उक्तीस अनुसरून ज्या मुलास लहानपणी बोलता येत नव्हते, हाता-पायांत पीळ होते... डोळे तिरळे होते... नीट बसता येण्याची सुतराम शक्यता नव्हती, अशी बहुविकलांगपणाची लक्षणे दिसत होती त्या ऋषिकेश शीतल सुदाम माळी या विद्यार्थ्यानं दहावीत घवघवीत यश मिळवलंय. ऋषीकेशनं 'सेरेब्रल पाल्सी' या असाध्‍य आजारावर मात करीत ऋषिकेशनं दहावीच्‍या परीक्षेत मिळवले ८६.६० टक्‍के गुण मिळवलेत. ऋषिकेश 'न्यू इंग्लिश स्कूल पाष्‍टी' ता. म्हसळा जि. रायगड या शाळेत शिकतो. त्यानं यंदा दहावीच्‍या परीक्षेत सेमी इंग्रजी माध्यमात ५०० पैंकी ४३३ इतके गुण मिळवलेत. 

विविध समस्यांमुळे ऋषिकेश अधून-मधूनच शाळेत जात असे. तसेच त्याला पूर्ण वेळ शाळा कधीच करता आली नाही. नववीच्‍या परीक्षेनंतर दहावी पाठ्यपुस्तकांचे सखोल वाचन, विविध यु ट्युब चॅनेलवरील मार्गदर्शन, तसेच पाष्टी शाळेतील सर्व शिक्षकांचे घरी मिळणारे मार्गदर्शन व शेवटी बालभारती व नवनीतच्या प्रश्नपत्रिकांचा सराव यामुळे परीक्षेत यश मिळवणे सोपे झाल्याचे त्याने सांगितले.

अभ्यासाबरोबरच आई बाबांनी माझा व्यायाम, फिजिओथेरेपी, योगासने, आहार व आरोग्य याची काळजी घेतली. सायकलिंग आणि नियमित चालणे, गायन या गोष्टींवरही कटाक्षाने मेहनत घेतल्याचे ऋषिकेशनं आवर्जून सांगितलं. 

fallbacks
ऋषिकेश माळी

इयत्ता दहावीच्‍या अभ्यासक्रमातील अरूणिमा सिन्हा, वैज्ञानिक स्टिफन हॅकिंग, ऑ गॉड फरगिव्ह मी या धड्यांनी आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकल्याचे त्याने सांगितले. तसेच विज्ञानातील 'स्टेम -सेल' थेरेपी या आधुनिक उपचाराचा त्याने जानेवारी महिन्यात स्वतःवर अनुभवही घेतला. उपचारानंतर मार्च महिन्यात थेरेपी व सततच्या बसण्यामुळे पाठदुखीने त्रस्त असतानादेखील, मंजूर लेखनिकास मागे बसवू ऋषिकेशनं स्वतःच्या हातानेच पेपर सोडविले.

'सेरेब्रल पाल्सी' म्हणजे मेंदूचा पक्षाघात... या जन्‍मभर साथ देणाऱ्या आजारावर मात करून ऋषिकेशने उत्तुंग यश संपादन केल्याबद्दल सर्व मित्रमंडळी आणि नातेवाईकांसह राज्यभरातून ऋषिकेशच्या जिद्दीचं कौतुक सुरू आहे. भविष्यात परीक्षा देऊन ऋषिकेशला अधिकारी बनवून दिव्यांग व खासकरून सेरेब्रल पाल्सीग्रस्त पाल्य व पालक यांचे मनोबल उंचावण्यासाठी व उज्वल भविष्यासाठी काम करणार असल्याचे त्याची आई शितल माळी यांनी सांगितले.

Read More