ST employees Salary: विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा बडगा उगारला होता. मार्च महिन्यात एसटी आगार विभागाच्या मुख्य ठिकाणी कर्मचाऱ्यांनी आपला आवाज उठवला. दरम्यान परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
आजच्या आज 120 कोटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होतील. कर्मचाऱ्यांना मंगळवारी पगाराची रक्कम मिळेल. 176 कोटींची मागणी केली होती. त्यातील 120 कोटी रक्कम आज मिळेल. वारंवार मागणी करावी लागू नये म्हणून 7 तारखेच्या आत सर्व पगार जमा होईल, असा निर्णय झालाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी हा प्रश्न लवकरात लवकर सोडवला.
काही त्रुटी तांत्रिक असतात. अधिकाऱ्यांनी काही तांत्रिक चुका केल्यायत. ऑडीट रिपोर्ट पाठवला नाही. पीएफचा एकही रुपया इतरत्र खर्च करु नये असे मी सांगितले. उर्वरित रक्कम 3 टप्प्यात देण्याचे वित्त विभागाने मान्य केलंय. पुढच्या महिन्यापासून 7 तारखेच्या आत पगार बॅंक खात्यात पोहोचेल, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी निश्चिंत रहावे, असे प्रताप सरनाईक म्हणाले.
तळागाळातील माणूस इथपर्यंत आलोय. मी 7-8 वर्षे रिक्षा चालवायचो. एकनाथ शिंदे आणि मी एकाच काळात रिक्षा चालवायचो. गरीबीतून आलेल्यांनाच हे प्रश्न कळतात, असे प्रताप सरनाईक म्हणाले. एसटी कर्मचा-यांच्या पगराबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. शासकीय कर्मचा-यांप्रमाणे एसटी कर्मचा-यांचाही पगार वेळेत व्हावा अशी मागणी त्यांनी केलीय.तसेच वेळेत पगार देण्याची जबाबदारी वित्त विभागाची असल्याचं प्रताप सरनाईकांनी म्हटलंय.सोबतच आपण पगाराची भीक मागत नसून तो आमचा हक्क असल्याचंही परिवहनमंत्र्यांनी म्हटलंय.
एसटी कर्मचा-यांच्या पगारावरून आता अजित पवार आणि एकनाथ शिंदेंमध्ये श्रेयवाद सुरू झालाय.एसटी कर्मचा-यांच्या पगारावरुन शिंदे-पवारांमध्ये श्रेयवाद पाहायला मिळाला.
वेतनाच्या मुद्द्यावरुन वित्त खाते आणि परिवहन खात्यात विसंवाद आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला. एकीकडे एकनाथ शिंदेंनी वित्त सचिवांना फोन करुन वेतनाच्या मुद्द्यावर तोडगा काढल्याचं म्हटलंय. तर दुसरीकडे वेतनाचा प्रश्न परिवहन खाते आणि मुख्यमंत्र्यांसोबत बैठक करुन सोडवू असं अजित पवार म्हणालेत.
अजित पवार विरुद्ध शिवसेना संघर्ष शिगेला पोहोचलाय. अर्थमंत्री अजित पवारांनी निधी अडकवल्याचा आरोप शिवसेनेच्या मंत्र्यांनी केलाय. अजितदादांनी एसटीचा पगारही अडकवल्याचा आरोप परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलाय. अजित पवारांकडून फाईल्सही परत येत असल्याचा गंभीर आरोप सरनाईकांनी केलाय. 2021मध्येही एकनाथ शिंदेंनी अजित पवारांवर खापर फोडलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध अजित पवार संघर्षाला तोंड फुटलंय.
एसटी कामगारांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढीचा दर लागू आहे. महागाई भत्याची 2018 पासूनची थकबाकी प्रलंबित आहे. न्यायालयाने थकबाकी देण्याबाबतचा निर्णय दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे आता महागाई भत्ता 53 टक्के लागू केला आहे. त्यामुळे महागाई भत्ता थकबाकी ही फेब्रुवारी 2025 मधील देय वेतनात देण्यात आले आहे. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप 43 टक्के महागाई भत्ता देण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 53 टक्के महागाई भत्ता एसटी कर्मचाऱ्यांना देखील देण्यात यावा. यासोबतच एप्रिल 2016 ते 2021 पर्यंतचे घरभाडे आणि वार्षिक वेतनवाढीची थकबाकी प्रलंबित आहे ते देखील देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, जाचक शिस्त आणि आवेदन कार्यपद्धती रद्द करा. तसेच एसटी चालकांचा दोष नसताना देखील आरटीओ विभागाकडून करण्यात आलेली दंडात्मक कारवाई देखील रद्द करण्याची मागणी ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केली.