ST Ticket Fare Discount: महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी तुम्हाला एसटी खूप फायद्याची ठरते. स्वस्त दरात सुरक्षित प्रवासासाठी तुम्हाला एसटी उपयोगी पडते. महाराष्ट्रातील एसटी प्रवाशांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. एसटीच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या म्हणजेच 150 कि.मी.पेक्षा जास्त प्रवासासाठी आगाऊ आरक्षण केल्यास तुम्हाला फायदा मिळणार आहे.
सवलतधारक प्रवासी वगळून प्रवाशांना तिकीट दरात 15 टक्के सवलत दिली जाणार आहे. ही योजना दिवाळी व उन्हाळी सुट्टीचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे. या योजनेची सुरुवात 1 जुलैपासून करण्यात येत आहे. असे असले तरी ही योजना पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठीच लागू राहणार आहे.
येत्या आषाढी एकादशीला आणि गणपती उत्सवासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. राज्यभरातून पंढरपूर येथे जाणाऱ्या नियमित बसेसचे आरक्षण प्रवाशांनी केल्यास त्यांना त्यांच्या तिकीट दरात 15 टक्के सवलत उद्यापासून (1जुलै) लागू होत आहे. असे असले तरी जादा बसेससाठी ही सवलत लागू नसेल. तसेच गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी प्रवाशांना देखील आगाऊ आरक्षण केल्यानंतर या तिकिटाचा लाभ घेता येऊ शकतो.
मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या प्रतिष्ठित इ-शिवनेरी बसमधील पुर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल. आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनी प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर , public.msrtcors.com या एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा msrtc Bus Reservation या मोबाईल ॲपद्वारे तिकीट आरक्षित केल्यास त्यांना 15% सवलत प्राप्त करता येऊ शकते.
मेट्रो आणि लोकलप्रमाणे एसटीचे तिकीटदेखील यूपीआय व इतर संकेतस्थळांद्वारे ऑनलाइन काढता येते. याच पार्श्वभूमीवर आता महामंडळ डिजिटल पेमेंट्सला चालना देत असून, एनसीएमसी कार्डधारकांसाठी विशेष सवलती देण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकारच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) योजनेनुसार एसटी महामंडळ आपल्या तिकिटिंग प्रणालीचे या प्रणालीसोबत एकत्रीकरण करणार आहे. यामुळे प्रवाशांना विविध वाहतूक सेवा वापरण्यासाठी वेगवेगळ्या तिकिटांची गरज भासणार नाही. एकच कार्ड सर्वत्र चालणार असल्याने वेळ आणि त्रास वाचणार आहे.
केंद्र सरकारने सुरू केलेली एकसंध डिजिटल पेमेंट प्रणाली
एकाच कार्डवर सर्व सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी तिकीट खरेदी करता येते
एनएफसी तंत्रज्ञानावर आधारित
रिअल टाइम व ऑफलाइन व्यवहाराची सोय
रोख रकमेची गरज नाही, डिजिटल व्यवहाराला चालना
एसटीच्या प्रवाशांची संख्या कमी होत असली तरी महिला सन्मान योजना, अमृत ज्येष्ठ नागरिक सवलती अशा विविध योजनेत सहभागी होणाऱ्या प्रवाशांची संख्या १५ टक्क्यांनी वाढली आहे. प्रवाशांना तिकीट खरेदी करणे अधिक सोयीस्कर व्हावे आणि प्रवासी संख्या वाढावी, यासाठी एसटी महामंडळ एनसीएमसी कार्डधारकांना आकर्षक सवलती देण्याचा विचार करत आहे.
राज्यात प्रथमच विठ्ठल भक्तांसाठी एसटीकडून खास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार 40 भाविकांच्या ग्रुपने लालपरी बुक केल्यास त्यांना आषाढी यात्रेला स्वस्तात विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाता येणार आहे. राज्यातील कोणत्याही गावातून 40 अथवा त्यापेक्षा अधिक भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे. आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्री श्रेत्र पंढरपूरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी एसटीने यात्राकाळात 5 हजार 200 विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती परिवहन मंत्री, एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. श्री श्रेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक-प्रवाशी येतात. एसटीने यंदापासून थेट गावातून पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिली आहे.