शिक्षकांची बदली होणं ही आपल्या सगळ्यांसाठी अतिशय सामान्य बाब आहे. पण त्या विद्यार्थ्यांच्या मनातील भावना आपण कधी समजून घेतल्या आहेत का? या भावना व्यक्त करणारं एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पुण्यातील हडपसर भागातल्या हमीद सुयोग बेंद्रे या विद्यार्थ्यांने थेट शरद पवार यांना पत्र लिहिलं आहे. साधना प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या हमीदला आपल्या शाळेतील बाईंची बदली होत असल्याचं कळलं. ही बदली थांबवण्यासाठी काय करु शकतो असा प्रश्न त्याने पालकांना विचारला. तेव्हा पालकांनी त्याला शरद पवारांना पत्र लिहिण्याचा सल्ला दिला.
हे पत्र इतकं गोड आहे की, सध्या ते चर्चेचा विषय ठरत आहे. पत्रात म्हटलंय की,'ताई चांगल शिकवतात, त्यांची बदली करु नका, त्या आम्हाला ओरडत नाही'. साधना प्राथमिक विद्यामंदिरातील इयत्ता तिसरीच्या वर्गशिक्षिका शारदा देवडे यांची बदली झाली आहे. या बदलीबाबत या चिमुकल्याने पत्र लिहिलं आहे.
प्रति, माननीय शरद पवार साहेब
अध्यक्ष
रयत शिक्षण संस्था, सातारा
नमस्कार,
माझे नाव हमीद सुयोग बेंद्रे. माध्या शाळेचे नाव साधना प्राथमिक विद्यामंदीर पुणे हडपसर-28. मी इयत्ता 3 रीमध्ये शिकत आहे. माझ्या वर्गशिक्षिका सौ. शारदा दवडे ताई आहेत. मला आज असे कळळे की, त्या मला उद्यापासून शिकवायला येणार नाहीत. त्यांची बदली अचानक केली आहे. हे ऐकून मला खूप रडू आले. मग मी मम्माला पप्पांना विचारले. ताईंना परत आणायला करायला पाहिजे. त्यांनी सांगितलं की, तुम्ही आमच्या ताईंना परत आणू शकता.
कारण ताई आम्हाला खूप छान शिकवतात. कधीही ओरडत नाही. म्हणून मला ताई याच शाळेत पाहिजे. माझी आपल्याला नम्र विनंती आहे की, ताईंची बदली करु नका. त्यांना आमच्यातच ठेवा.
आपला,
हमीद.
हमीदने या पत्रात आपल्या मनातील भावनांना वाट करुन दिली आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं एक खास नातं असतं. हेच नातं या पत्रातून अधोरेखित झालं आहे. हमीदने आपल्या या भावना पालकांशी शेअक केला.