Sunetra Pawar on Ajit Pawar CM : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे, याबद्दल अनेकदा चर्चा झाली आहे. खरंतर उपमुख्यमंत्रीपदासाठी अजित पवार यांच्या राजपाल यांच्याकडील पहाटेचा शपथविधी असो. किंवा त्यानंतर काका आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्व शरद पवार यांची साथ सोडणं असो. आता पुन्हा एकदा खासदार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्या एका मोठा वक्तव्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री कधी होणार यावर चर्चा रंगली आहे.
पांडुरंगाची इच्छा असेल तर अजित पवार मुख्यमंत्री होतील असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी केलंय. देहूत तुकोबारायांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालंय. यावेळी खासदार सुनेत्रा पवार यांनी तुकोबारायांचं दर्शन घेतलं. त्यानंतर सुनेत्रा पवारही वारक-यांसह भक्तीरसात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं. महिलांसह फुगडी खेळण्याचा आनंदही त्यांनी घेतला. चांगला पाऊस पडावा, शेतकरी सुखी व्हावा अशी प्रार्थना केल्याचंही सुनेत्रा पवारांनी सांगितलंय.
अजित पवार यांनी यापूर्वी मुख्यमंत्री होण्याची इच्छा मुंबईत मे महिन्यात झालेल्या एका कार्यक्रमात थेट व्यक्त केली होती. त्यावेळी ते म्हणाले होती की, गेल्या अनेक वर्षांपासून मलाही वाटतं की, मी मुख्यमंत्री व्हावं. पण कुठे जमतंय. असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची इच्छा प्रकर्षाने बोलून दाखवली होती. अजित पवार यांनी अनेकदा उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली आहे. पण मुख्यमंत्रीपदापासून अजित पवार अजूनही दूर आहेत.
पण अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यानंतर ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी त्यांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती, असं सांगितलं होतं. जर अजित पवार महाविकास आघाडीत आले तर त्यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण होईल असं सांगण्यात आलं होतं.
खरं तर महाराष्ट्रातील राजकारणातील सत्तेची चढाओढ आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदासाठीची रस्सीखेच गेल्या काही वर्षांमध्ये पाहिला मिळाली आहे. या सत्तेच्या राजकारणात अनेक मोठ्या पक्षात भूकंप झाले आहेत. ज्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणाने वेगळेच वळण घेतले आहे. याच सत्ता आणि खुर्चीच्या खेळामुळे महाराष्ट्राला पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत.