Raj Thackeray Fear North Indians In Mumbai: मुंबईत उत्तर भारतीयांची सत्ता येऊ शकते. येथे एक उत्तर भारतीय महापौर बसू शकतो, असे विधान करणाऱ्या उत्तर भारतीय सेनेच्या सुनील शुक्लाने आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना भित्रा म्हटलं आहे. राज ठाकरे उत्तर भारतीयांना घाबरले असून ही भीती आवश्यक असल्याचं सुनील शुल्काने ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओत म्हटलं आहे. राज ठाकरेंना वाटलेली भीती हाच उत्तर भारतीयांचा विजय आहे असंही सुनील शुक्लाने म्हटलं आहे.
राज ठाकरेंनी वरळीमधील मेळाव्यात उत्तर भारतीयांना मागील काही दिवसांमध्ये मुंबईच्या वेगवेगळ्या भागात झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना एक सल्ला दिला. प्रेमाने समजावून सांगा मात्र मुजोरी दाखवली कर कानाखाली बसलीच पाहिजे, असं सांगतानाच राज ठाकरेंनी मारहाण केली तरी त्याचा व्हिडीओ काढू नका असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला. मार खाणाऱ्याने सांगितलं पाहिजे त्याला मारलंय, मारणाऱ्याने त्याबद्दल सांगत फिरु नये, असं राज आपल्या भाषणात म्हणाले. हाच मुद्दा पकडून सुनील शुक्लाने राज ठाकरे उत्तर भारतीयांना घाबरल्याचा दावा आहे.
आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केलेल्या मिनिटभराच्या व्हिडीओमध्ये सुनील शुल्काने राज ठाकरेंनी घाबरुनच व्हिडीओ शूट करु नये असं सांगितल्याचं म्हटलंय. "राज ठाकरेंचा वरळीमध्ये कार्यक्रम झाला. उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येत यांनी हा निर्णय घेतला की, आम्ही हिंदी भाषिकांना मारणार नाही. मारलं तरी त्याचा व्हिडीओ बनवणार नाही. हे घाबरले आहेत. राज ठाकरे घाबरले आहेत कारण, आज सुनिल शुक्लाने सुप्रीम कोर्टात अशाप्रकारे मारहाण झाल्यास या लोकांवर कारवाई करा अशी मागणी केली आहे. ही भीती असली पाहिजे. हिंदी भाषिकांना तुम्ही भाषेच्या नावावर मारत असाल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही," असं सुनील शुक्ला व्हिडीओत म्हणालाय.
"तुमच्या भीतीमुळे आमचा विजय झाला आहे. तुम्ही घाबरल्याने आम्ही जिंकलोय. सर्व सनातनी हिंदी भाषिक जिंकले आहेत. मराठी भाषेच्या नावावर तुम्ही द्वेष पसरवण्याचं जे काम करत आहात तो द्वेष उत्तर भारतीय विकास सेनेचे लोक संपवतील. तुम्ही घाबरुन राहिलं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र!" असं सुनील शुक्लाने व्हिडीओच्या शेवटी म्हटलं आहे.
सुनील शुक्लाने यापूर्वी मुंबईत हिंदी भाषिक महापौर होऊ शकतो असं गणित मांडणारा व्हिडीओ पोस्ट केलेला. संपूर्ण मुंबईची लोकसंख्या 2 कोटी 10 लाख आहे. यात 1 कोटी नागरिक मराठी आहेत, 1 कोटी नागरिक उत्तर भारतीय आहेत. तर इतर राज्यातील 10 लाख लोक आहेत. मुंबईतील मराठी माणूस 5 पक्षात विखुरला गेलाय. त्यामुळे मुंबईत उत्तर भारतीयांची सत्ता येऊ शकते. येथे एक उत्तर भारतीय महापौर बसू शकतो असा तर्क सुनील शुक्लाने मांडलेला.