प्रफुल पवार (प्रतिनिधी) रायगड: शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सिंचन घोटाळ्यावरून सुनील तटकरेंना धमकीवजा इशारा दिला आहे. कथित सिंचन घोटाळ्याची फाईल अजूनही बंद झाली नसल्याचा इशारा महेंद्र थोरवे यांनी दिला. दरम्यान यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत.
रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेमधला वाद थांबण्याचं नावचं घेत नाहीये. कारण रायगडमध्ये राष्ट्रवादी विरूद्ध शिवसेना हा वाद पुन्हा एकदा पेटलाय. रायगडचे खासदार सुनील तटकरेंना त्यांच्याच मित्रपक्षांनी तंबी दिली. कथित सिंचन घोटाळ्याची फाईल अजूनही बंद झालेली नाही असा धमकीवजा इशारा शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांना दिला आहे.
महेंद्र थोरवेंनी तटकरेंना दिलेल्या इशाऱ्यानंतर राष्ट्रवादीनं देखील त्यांच्यावर पलटवार केलाय. थोरवेंच्या डान्सबारचे संस्कार संपूर्ण महाराष्ट्राने बघितले आहेत. त्यामुळे महेंद्र थोरवेंनी औकातीत राहावं आणि आमच्या नादाला लागू नये असा इशारा आनंद परांजपे यांनी थोरवेंना दिला आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादीमधल्या वादावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीत अशा प्रकारे जाहीर वक्तव्य करू नये तसंच आपल्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांसोबत बसून वाद सोडवावेत असा सल्ला बावनकुळे यांनी दिला आहे.
दादांची राष्ट्रवादी आणि शिवसेनेमधले वाद तसे नवीन नाहीत. मविआच्या काळात देखील शिंदेंच्या नेत्यांनी दादांवर निधीवरून आरोप केले होते. तसंच रायगडच्या पालकमंत्रिपदावरून देखील दोन्ही पक्षांमध्ये वाद आहेत. आणि आता महेंद्र थोरवे यांनी दिलेल्या इशा-यानंतर हा वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे.