Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Raj Thackeray : आमदार अपात्रतेवरुन राज ठाकरेंचा शिंदेंना सूचक इशारा; उद्धव यांचा संदर्भ देत म्हणाले, "आधीचे मुख्यमंत्री..."

Raj Thackery On MLA disqualification: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा संदर्भ देत विद्यामान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सूचक शब्दांमध्ये इशारा दिला आहे.

Raj Thackeray : आमदार अपात्रतेवरुन राज ठाकरेंचा शिंदेंना सूचक इशारा; उद्धव यांचा संदर्भ देत म्हणाले,

Raj Thackery On Uddhav Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackery) यांनी राज्यातील सत्ता संघर्षासंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाबद्दल सूचक विधान केलं आहे. सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांच्या अपत्रातेचं प्रकरण निकाली काढण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडेच दिल्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सूचक शब्दांमध्ये इशारा दिला आहे. राज ठाकरे हे आज मीरा रोड दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्यादरम्यान प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंशी चर्चा करताना राज यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना हे विधान केलं. 

सुप्रीम कोर्टाच्या निकालावर भाष्य

राज ठाकरेंना आधी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयासंदर्भात विचारण्यात आलं असता त्यांनी कोर्टाची भाषा ही फार गोंधळून टाकणारी असते असं म्हटलं. तसेच पुढे बोलताना सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयामध्ये अधिक स्पष्टता येण्याची गरज आहे. न्यायालयाचा निकाल विधिमंडळाच्या गटाला पक्ष म्हणून मान्यता देत नाही मग निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचं काय? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच राज यांनी या प्रकरणासंदर्भात देण्यात आलेला निर्णय हा गोंधळात टाकणार आहे. या निर्णयानंतर आता निवडणूक आयोग काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, असं सांगतानाच राज यांनी या प्रकरणाची संपूर्ण धूळ खाली बसल्यानंतर नेमकं काय घडलं आहे याची माहिती आपल्या सर्वांना कळेल, असं विधान केलं.

"प्रत्येक मुख्यमंत्र्याने..."

एका मुलाखतीमध्ये तुम्ही मुख्यमंत्र्यांना 'जपून राहा!' असा सल्ला दिला होता. त्यातच कालचा कोर्टाचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे गेला आहे, असं म्हणत राज ठाकरेंना पत्रकाराने प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना राज ठाकरेंनी राज्यातील सत्तासंघर्षाला सुरुवात झाली त्या एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंबद्दल भाष्य केलं. "कुठच्याही मुख्यमंत्र्यांनी जपूनच राहिलं पाहिजे. आधीचे मुख्यमंत्री जपून नाही राहिले म्हणून हे सर्व उभं राहिलं. आपण कुठल्या पदावर आहोत हे प्रत्येकाने समजून जपून राहिलं पाहिजे," असं राज ठाकरे म्हणाले.

नार्वेकरांकडे अधिकार

सध्या राज्यामध्ये 16 आमदाराच्या अपात्रतेच्या प्रकरणावर निर्णय देण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुप्रीम कोर्टाने दिला असल्याने या मुद्द्यावरुन राजकारण रंगलं आहे. विधानसभा अध्यक्षांनी वेळेत निकाल देऊ असं म्हटलं आहे. तर दुसरीकडे नार्वेकर हे भाजपाचे नेते असल्याने ते शिंदे गटाच्या बाजूनेच निर्णय देतील अशी दाट शक्यताही व्यक्त केली जात आहे. आता नार्वेकरांच्या निकालाकडे सत्ताधारी आणि विरोधकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

Read More