Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा सस्पेंस ! जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला की नाही?

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा जयंत पाटील यांनी दिलाय की नाही यावरुन संभ्रम निर्माण झाला आहे. जयंत पाटलांच्या राजीनाम्याचं कोणतंही अधिकृत पत्र अजून जाहीर झालेलं नाही. 

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा सस्पेंस ! जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला की नाही?

Jayant Patil : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील आहेत की नाहीत, त्यांनी राजीनामा दिलाय का याबाबत अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाही. शनिवारी जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या आल्या. पण याला अधिकृतपणे कुणीही दुजोरा दिलेला नाही. एवढंच नाही तर राष्ट्रवादीनं कोणतंही अधिकृत पत्रही काढलं नाही. तरीही जयंत पाटलांच्या राजीनाम्याची चर्चा राजकारणात झाली. एवढंच नाही तर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून शशिकांत शिंदेंची निवड झाल्याचंही सांगण्यात आलं. शशिकांत शिंदेंनी लागलीच आपण तयार असल्याचंही सांगून टाकलं.

दुसरीकडं जितेंद्र आव्हाड यांनी मात्र जयंत पाटील हेच प्रदेशाध्यक्षपदी कायम असल्याचं सांगितलं. सुरुवातीला त्यांनी जयंत पाटलांच्या राजीनाम्याचं वृत्त खोडसाळपणा असल्याचं सांगितलं. नंतर पत्रकार परिषदेत जयंत पाटील पुढच्या काळात असा निर्णय घेऊ शकतात असं सांगितलं.15 जुलैला राष्ट्रवादीच्या बैठकीत नवा प्रदेशाध्यक्ष ठरेल अशी चर्चा आहे. पण अजूनही जयंत पाटलांच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या बायोमध्ये प्रदेशाध्यक्ष असल्याचा उल्लेख आहे. दुसरीकडं अजितदादांनी आपल्या परिनं अंदाज लावलाय. जयंत पाटलांना दिल्लीत जायचं असावं म्हणून ते प्रदेशाध्यक्षपद सोडू शकतात असा अंदाज दादांनी लावलाय.

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद जयंत पाटील सोडणार ही चर्चा विधानसभा निकालाच्या दिवसापासून आहे. मागच्या काळात तर त्यांना हटवण्यासाठी मोहीमच सुरु झाली होती. शरद पवारांनी तो निर्णय योग्य वेळी घेऊ असं सांगितलं होतं. ती वेळ 15 जुलैला येणार आहे की नाही याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झालीय.
जयंत पाटलांनी अद्याप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही. त्यांनी राजीनाम्या दिल्याच्या बातम्या खोट्या आहेत. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी SP चे नेते एकनाथ खडसे यांनी दिली.

Read More