Navi Mumbai News: नवी मुंबईमध्ये एक अत्यंत विचित्र प्रकार समोर आला आहे. भीतीने स्वत:ला पाच वर्षांपासून कोंडून घेत सॉफ्टवेअर इंजिनिअरची सुटका करण्यात आली आहे. एका सेवाभावी संस्थेनं पुढाकार घेऊन या व्यक्तीची सुटका केली आहे. सदर व्यक्ती मानसिक तणावाखाली असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल नेरेमधील सील आश्रमाच्या सदस्यांनी 55 वर्षीय अनुप नायर नावाच्या व्यक्तीला उपचारानिमित्त तब्बल पाच वर्षानंतर घराबाहेर काढलं. आई-वडील आणि भावाच्या मृत्यू नंतर अनुप नायर हे मानसिक तणावात होते. याच तणावातून त्यांनी स्वत:ला कोंडून घेतलं होतं. एका महिला एलआयसी एजंटने अनुप यांची संपत्ती हडप करण्याची भीती त्यांच्या मनात घातली होती. या महिलेने स्वतःला या संपत्तीचा वारस म्हणून नोंद केली होती. याच महिलेच्या भीतीने अनुप डिप्रेशनमध्ये गेले आणि त्यांनी स्वत:ला कोंडून घेतलं होतं.
नवी मुंबईतील जुईनगरमधील घरकुल सोसायटीत स्वतःला तब्बल पाच वर्ष घरात कोंडून ठेवलेल्या अनुप यांना त्यांच्याच घरातून रेस्क्यु करत आश्रमात आणण्यात आलं आहे. अनुप यांच्यासोबत मागील पाच वर्षांमध्ये काय काय घडलं याचं संपूर्ण घटनाक्रम पाहूयात...
> 55 वर्षीय अनुप नायर हे पेशाने सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. त्यांच्या आई-वडीलांचा 2020 मध्ये मृत्यू झाला आणि काही कालावधीतच भावाचा मृत्यू झाला त्यामुळे ते एकटे पडले.
> घरातील तिन्ही सदस्यांचा मृत्यू झाल्याने तणावाखाली गेलेल्या अनुप यांनी स्वतःला 2020 ते 2025 पर्यंत घरामध्ये कोंडून घेतले.
> तब्बल पाच वर्ष घरातच कोंडून घेतलेल्या अनुप यांना पनवेल मधील सील आश्रमाच्या सदस्यांनी सोमवारी घरातून रेस्क्यू केले आहे.
> याचदरम्यान मधल्या काळात एलआयसी एजंट असलेल्या एका महिलेने कुणालाही भेटला तर तुला मारून टाकतील. तुमची संपती हडप करतील अशा प्रकारची फसवी बाब सांगून अनुपच्या नावावर असलेल्या संपत्तीवर वारसदार म्हणून स्वतःचे नाव नोंदवले.
> आपल्याला मारतील आणि संपत्ती हडप करतील या भीतीने अनुपने स्वतःला कोंडून घेतले.
> याच कालावधीत अनुप हॉटेलमधून जेवणाच्या ऑर्डर दिल्या. बाहेरच्या जगाशी त्याचा संपर्क यायचा तो केवळ या डिलेव्हरी बॉइजशी. अनुपने त्याच्या घरातील कचरा काढला नाही आणि कपडेही धुतले नाहीत असं मदतीसाठी पोहचलेल्या स्वयंसवेकांच्या लक्षात आलं. घरातील कचरा आणि अस्वच्छता पाहून त्यांना धक्काच बसला.
> अनुप बाहेर पडत नाही. कोणाशी बोलत नाही, घरातील कचराही बाहेर ठेवत नाही यामुळे शेजारील व्यक्तीला संशय आल्याने त्यांनी सील आश्रमातील लोकांना बाब लक्षात आणून देताच त्यांनी घरात जाऊन अनुपला रेस्क्यू करत आश्रमात नेले.