Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

ठाकरेंच्या युतीची अग्निपरीक्षा! ठाकरे बंधूंची युती मुंबईवर भगवा फडकवणार?

ठाकरे बंधूंचा उद्या एकत्रित विजयी मेळावा होतोय. ठाकरे बंधुंच्या मनोमिलनामुळे दोन्ही पक्षांतील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालंय... ठाकरे बँडची जादू मुंबईत कशी चालणार हे ही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंसाठी ही अग्निपरिक्षा असणार आहे.   

ठाकरेंच्या युतीची अग्निपरीक्षा! ठाकरे बंधूंची युती मुंबईवर भगवा फडकवणार?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीचं पहिलं पाऊल विजयी मेळाव्याच्या निमित्तानं पडतंय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जवळपास 21 वर्षांनी एकाच व्यासपीठावर दिसणार आहे. गेल्या काही वर्षातल्या महाराष्ट्राच्या राजकारणातल्या घडामोडी पाहता दोन्ही ठाकरेंनी एकत्र येणं ही दोघांचीही राजकीय अपरिहार्यता मानली जातेय. बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीतच राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. राज ठाकरेंनी पुढल्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला. मनसेच्या माध्यमातून त्यांनी मराठीचा मुद्दा आक्रमकपणे हाती घेतला. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मवाळ झालेल्या शिवसेनेमुळं मराठी माणसाला मनसेच्या रुपानं नवा पर्याय सापडला होता. मनसेच्या परप्रांतीयांविरोधी आंदोलनामुळं मनसे लोकप्रियतेच्या शिखरावर गेली. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे 13 आमदार निवडून आले. नाशिकमध्ये मनसेला सत्ता मिळाली. मुंबई महापालिकेत, पुणे महापालिकेत नजरेत भरेल एवढे नगरसेवक निवडून आले. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मनसेची ज्या दणक्यात राजकीय एंट्री झाली ती गती मनसेला राखता आली नाही. पुढच्या काळात मनसेची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. मनसेचे काही राजकीय निर्णय चुकलेही... मराठीसह मनसेनं हिंदुत्वाचा पुकारा करुन पाहिला पण त्यातही यश मिळालं नाही. मनसेच्या राजकीय यशाचा आलेख कायम उणे राहिला.2024ची लोकसभा निवडणूक मनसेनं लढवली नाही. 2024च्या निवडणुकीत अडीचशे जागा निवडून मनसेला भोपळाही फोडता आला नाही.

राज ठाकरेंसारखीच अवस्था उद्धव ठाकरेंची झालीय. बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंनी शिवसेना समर्थपणं सांभाळल्याचं दिसलं..2014ची लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला चांगलं यश मिळालं पण ते यश कायम भाजपनं मोदींच्या खात्यावर नोंदवलं... 2019च्या लोकसभेचं यशावरही भाजप कायम हक्क सांगत राहिला... उद्धव ठाकरेंनी 2014 आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत आमदारांच्या संख्येची पन्नाशी कायम राखली... पण या यशाला मर्यादा राहिली. 2019ला महाविकास आघाडीच्या प्रयोगात उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद मिळालं खरं पण त्याची मोठी राजकीय किंमत त्यांना मोजावी लागली. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत उभी फूट पाडली. पुढं 2024च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला अवघ्या 20 जागांवर समाधान मानावं लागलं..

विधानसभा निवडणुकीतल्या अपयशानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसमोर अतिशय मर्यादित राजकीय पर्याय शिल्लक राहिलेत. महायुतीच्या वळचणीला जाऊन राज ठाकरे अस्तित्व टिकवून ठेऊ शकतील पण त्यांची राजकीय वाढ होणार नाही. मित्रपक्षाला कधीच वाढू द्यायचं नाही ही भाजपची रणनिती एव्हाना राज ठाकरेंच्या लक्षात आलीय. त्यामुळं त्यांनी वेगळ्या आणि लोकप्रिय प्रयोगाची वाट निवडलीये. उद्धव ठाकरेंची अवस्थाही फार वेगळी नाही. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या पक्षात असलेल्या निम्म्या नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. भाजपच्या माजी नगरसेवकांची संख्या शंभरीपर्यंत गेलीय. अशा परिस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सत्ताधारी महायुतीशी दोन हात करुन सत्ता खेचून आणेल असं उद्धव ठाकरेंनाही वाटत नाहीये.

दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर आहे. मुंबईतला उत्तर भारतीय मतदार भाजपकडं वळलाय. मराठी मतदारांमध्ये भाजप आणि शिवसेनेचा वाटा आहे. अशा परिस्थितीत दोन्ही ठाकरेंचा करिष्माच त्यांना तारू शकणार आहे. कागदावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची राजकीय शक्ती क्षीण झालीये. त्यामुळं राजकारणात एक अधिक एक अकरा या न्यायानं राजकीय चमत्कार होईल अशी आशा मनसेच्या नेत्यांना वाटतेय.

मराठी माणूस गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या पक्षात विभागला गेलाय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यानं मराठी माणसाची सहानुभूती मिळतेय. ही सहानुभूती मतांमध्ये परावर्तीत करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना मराठीचा दमदार आणि लोकप्रिय अजेंडा घेऊन वाटचाल करावी लागेल.

Read More