ब्युरो रिपोर्ट झी 24 तास मुंबई : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चेनं राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. अशामध्ये स्वाभाविकपणे उद्धव ठाकरे महत्त्वाचा घटक असलेल्या महाविकास आघाडीचं काय होणार हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन ठाकरेंनी एकत्र येणं नव्या राजकीय समीकरणाचा प्रारंभ ठरणार असेल, तर तीच महाविकास आघाडीच्या समारोपाची नांदी ठरणार नाही ना असा प्रश्नही आता विचारला जात आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीच्या चर्चांना आता जोर आलाय. ठाकरे बंधूंही युतीसाठी अनुकूल आहेत. दुसरीकडं उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक आणि राज ठाकरेंचे मनसैनिकही युतीबाबत प्रचंड आशावादी आहेत. सगळ्यांना युती व्हावी असंच वाटतंय. उद्धव ठाकरेंनीही सगळ्यांच्या मनासारखं होईल असं सांगून टाकलंय. पण ठाकरे बंधूंची युती झाली तर महाविकास आघाडीचं अस्तित्व काय असणार असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय. राज ठाकरे काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाणार नाही हे त्यांनी यापूर्वी स्पष्ट केलंय. राज ठाकरे महाविकास आघाडीत राहणार की नाही असा प्रश्न महायुतीच्या नेत्यांनी विचारला आहे.
राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यानं महाविकास आघाडी आणखी मजबूत होऊ शकते असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय. दोन्ही भावांचे हातात हात घेऊ द्या मग तिसरा हात कसा द्यायचा ते पाहू असंही काँग्रेसनं सांगितलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसही ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीबाबत प्रचंड आशावादी आहे. राष्ट्रवादीला मविआच्या भवितव्याची काळजी वाटत नाही आहे. आगामी निवडणुका पाहता मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला महाविकास आघाडीचा फायदा होण्याऐवजी अडचणच जास्त होणार आहे. त्यामुळं ठाकरे बंधूंची युती झाल्यास मविआ मोडीत निघण्याची शक्यता थोडी जास्त वाटू लागली आहे.