Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

विनयभंगाचा गुन्हा दाखल करणाऱ्या वडील, भावाविरोधात पोलिसांनी सुरु केला तपास कारण..; अंबरनाथमधील विचित्र प्रकार

Thane Ambarnath Crime News Today: या प्रकरणामध्ये समोर आलेला तपशील हा फारच धक्कादायक असून मागील 2 वर्षांपासून सुरु असलेल्या या प्रकरणाला नवा ट्विस्ट आला आहे.

विनयभंगाचा गुन्हा दाखल करणाऱ्या वडील, भावाविरोधात पोलिसांनी सुरु केला तपास कारण..; अंबरनाथमधील विचित्र प्रकार

-चंद्रशेखर भुयार (झी 24 तास प्रतिनिधी) / अंबरनाथ

Thane Ambarnath Crime News Today: एखाद्या प्रकरणामध्ये गंभीर गुन्हा दाखल झाल्यानंतर समोरच्या व्यक्तीलाच अडकवण्याचा कट रचत थेट तसा बनाव करुन नाट्यमय घडामोडींच्या माध्यमातून थेट पोलिसांमध्ये तक्रार नोंदवण्यापर्यंतचा प्रकार तुम्ही एखाद्या चित्रपटामध्ये किंवा ओटीटी वेब सिरीजमध्ये पाहिला असेल. मात्र नुकत्याच अंबरनाथमधून समोर आलेल्या एका विचित्र गुन्हामध्ये असेच काहीसे घडले आहे. आपल्यावर दाखल विनयभंगाच्या गुन्ह्याचा बदला घेण्यासाठी एका तरुणाने फिर्यादीचे वडील आणि भावावर हत्येच्या प्रयत्नाचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा प्रकार घडकीस आला आहे. पोलिसांनी तपासात हा सारा गोंधळ उघड केला असून यानंतर या तरुणासह त्याच्या साथीदारांवर उलटा गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 

नेमकं केलं काय?

अंबरनाथच्या जावसई परिसरात राहणाऱ्या आकाश अमर जित गुप्ता याच्याविरोधात दोन वर्षांपूर्वी सोनल जैस्वार या तरुणीने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. त्याचा बदला घेण्यासाठी अमरजितने सोनलचे वडील आणि भावाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट रचला. आकाशसह त्याचा भाऊ कन्हैय्या गुप्ता, सिद्धार्थ गायकवाड, मोनू कश्यप, आदित्य जैस्वार आणि अजित चौहान यांनी मिळून आकाशच्या हत्येच्या प्रयत्नाचा बनाव रचला. यासाठी कन्हैय्याने वस्तरा आणला, मोनू कश्यप आणि आदित्य जैस्वारने ब्लेड आणले, तर सिद्धार्थ गायकवाड याने त्याचाच मित्र अजित चौहान याच्यावर वार केले. यानंतर मोनू आणि आदित्यने अजित चौहानला सेंट्रल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

जबाबात काय दावा केला?

पोलिसांना दिलेल्या जबाबात अजितने सोनल जैस्वारचे वडील नागेंद्र जैस्वार आणि भाऊ आदित्य जैस्वार यांनी आपल्यावर वार केल्याचा आरोप केला. त्यानुसार पोलिसांनी या दोघांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. मात्र प्रत्यक्षात गुन्हा घडला त्यावेळेस हे दोघे तिथे नसल्याचं तांत्रिक तपासात स्पष्ट झालं. त्यात मागच्या विनयभंगाच्या गुन्ह्याचाही संदर्भ पोलिसांना मिळाला, अन पोलिसांनी उलटा तपास सुरू केला. यात या सर्वांनी मिळून बनाव रचत नागेंद्र आणि आदित्य जैस्वार यांना अडकवण्याचा कट रचल्याचं स्पष्ट झालं.

कोणाविरोधात दाखल झाला गुन्हा?

पोलिसांनी आकाश गुप्ता, कन्हैया गुप्ता, सिद्धार्थ गायकवाड, मोनू कश्यप, आदित्य जैस्वार आणि अजित चौहान या सर्वांच्या विरोधात कट रचणे, खोटी माहिती पुरवणे, गुन्ह्याचा खोटा आरोप करणे या कलमान्वये सु-मोटोने गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकल्या. अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद आणि डीबी पथकाचे एपीआय विजय काजारी यांच्या सतर्कतेमुळे हा गुन्हा उघड झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे.

Read More