Thane Metro 4 And 4A: ठाणेकरांना लवकरच मेट्रोचे गिफ्ट मिळणार आहे. ठाणेकरांच्या सेवेसाठी या वर्षातच मेट्रो धावणार आहे. ठाण्यात सप्टेंबर महिन्यात मेट्रोची चाचणी होणार असून डिसेंबर अखेरीस मेट्रो सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरात मेट्रोचे जाळे मजबूत करण्याचे काम सुरू आहे, त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक कमी होईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
ठाणे महापालिकेच्या वतीने रविवारी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेट्रो कामाबाबत माहिती दिली. मेट्रो सुरू झाल्यास नागरिक खासगी वाहनांचा वापर कमी करून मेट्रोने प्रवास सुरू करतील. सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उत्तम असेल तर नागरिक त्याचा वापर अधिक करतात, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
ठाण्यातदेखील अंतर्गत मेट्रोला मंजुरी मिळाली आहे. वडाळा घाटकोपर-कासारवडवली ही मुख्य मेट्रो मार्गिका ठाण्यात असेल. या मुख्य मेट्रो मार्गिकेला अंतर्गत मेट्रो जोडली जाणार असल्याचे शिंदे म्हणाले.
वडाळा ते कासारवडवली मेट्रो मार्ग 4 हा 32.32 किमी लांबीचा उन्नत मार्ग आहे. सदर मार्गामध्ये एकूण 30 स्थानके असतील. सध्याच्या ईस्टर्न एक्स्प्रेस रोडवे, मध्य रेल्वे, मोनोरेल, सध्या सुरू असलेला मेट्रो मार्ग 2ब(डी एन नगर ते मंडाळे), मेट्रो मार्ग 5 (ठाणे ते कल्याण), मेट्रो मार्ग 6 (स्वामी समर्थनगर ते विक्रोळी) यांना जोडणार आहे.
1. भक्तीपार्कमेट्रो, 2. वडाळाटीटी, 3. अनिकनगरबसडेपो, 4. सिद्धार्थकॉलनी, 5. गरोडियानगर, 6. पंतनगर, 7. लक्ष्मीनगर, 8. श्रेयससिनेमा, 9. गोदरेजकंपनी, 10. विक्रोळीमेट्रो, 11. सूर्यानगर, 12. गांधीनगर, 13. नेव्हलहाऊसिंग, 14. भांडुपमहापालिका, 15. भांडुपमेट्रो, 16. शांग्रीला, 17. सोनापूर, 18. फायरस्टेशन, 19. मुलुंडनाका, 20. ठाणे तीनहात नाका, 21. आरटीओ ठाणे, 22. महापालिकामार्ग, 23. कॅडबरी जंक्शन, 24. माजिवडा, 25. कापूरबावडी, 26. मानपाडा, 27. टिकूजी-नि-वाडी, 28. डोंगरीपाडा, 29. विजयगार्डन, 30. कासारवडवली
वडाळाला कापूरबावडीने जोडणाऱ्या कॉरिडोरला गायमुखपर्यंत मेट्रो 4 एने जोडले जाणार आहे. ही मेट्रो लाइन मीरा-भाईंदर (मेट्रो 10)ने देखील जोडली जाणार आहे. ही मेट्रो लाइन सुरू झाल्यानंतर ठाणेकरांना मुंबईत येणे सोप्पे होणार आहे. ठाणे व आसपासच्या परिसरातील नागरिकांना फायदा होणार आहे.
कासारवडवली ते गायमुखपर्यंत मेट्रो मार्ग 4अ हा 2.7 किमी लांबीचा उन्नत मार्ग आहे. यात 2 स्थानके असून हा मुंबई मेट्रो मार्ग 4 (वडाळा - घाटकोपर - मुलुंड - ठाणे - कासारवडवली) या मार्गाचा कासारवडवली बाजूचा विस्तार आहे. मेट्रो मार्ग 4 हा कासारवडवली मेट्रो मार्ग 4 आणि गायमुख मेट्रो मार्ग 10 ला जोडण्यात येणार आहे.
मेट्रो 4 ची अंदाजे किंमत 14,549 कोटी रुपये आहे, तर मेट्रो 4A ची किंमत 949 कोटी रुपये आहे (63 कोटींच्या वाढीसह).
मेट्रो 4 आणि 4A मुळे घोडबंदर रोड, ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे, आणि एलबीएस मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल.
मेट्रो 4 आणि 4A मुळे वडाळा, विक्रोळी, मुलुंड, आणि ठाणे येथील स्थानकांजवळील निवासी आणि व्यावसायिक मालमत्तांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. सुधारित कनेक्टिव्हिटीमुळे या भागात पायाभूत सुविधांचा विकास होईल आणि भाड्याचे उत्पन्न वाढेल.