मनश्री पाठक झी 24 तास मुंबई: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यानं राज्याच्या राजकारणाती समीकरणं बदललीयेत. तब्बल 20 वर्षानंतर दोन्ही भाऊ एकाच व्यासपीठावर आल्यानं त्यांच्याकडं सगळ्यांच्याच नजरा लागल्या होत्या. या भेटीत दोघांची देहबोली पाहण्यासारखी होती.
विजयी मेळाव्यात दोन्ही भावांची देहबोलीकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. 20 वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर आलेल्या राज आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांची देहबोली कशी असेल याची उत्सुकता होती. ही उत्सुकता फक्त राजकीय अभ्यासकांना नव्हती. तर ठाकरे बंधू एकत्र यावेत अशी आशा लावून बसलेल्या सामान्य शिवसैनिक आणि मनसैनिकांची होती. विजयी मेळाव्यासाठी जेव्हा उद्धव ठाकरे वरळीत पोहचले तेव्हाच त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होतं. कोणताही तणाव त्यांच्यात नव्हता. त्यांचं स्वागत बाळा नांदगावकरांनी केलं तेव्हा त्यांचा चेहरा त्यांच्या मनातला आनंद सांगत होता. राज आणि उद्धव ठाकरे स्टेजवर येण्याआधी जेव्हा स्टेजच्या दोन्ही बाजुला उभे होते तेव्हा दोघांच्या चेह-यावर बंधूभेटीचा आनंद होता. जेव्हा दोन्ही भाऊ स्टेजवर आले त्याक्षणी एकच जल्लोष झाला. त्यावेळी दोन्ही भावांनी एकमेकांना अलिंगण देऊन उपस्थितीतांना अभिवादन केलं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जरी भाऊ असले तरी दोघांनीही एकमेकांचा उल्लेख सन्माननीय असं विशेषण लावलं.
राज ठाकरेंचं भाषण सुरु असताना मोठ्या भावाच्या चेहऱ्यावर जे भाव असतात ते भाव उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर होते. जेव्हा राज ठाकरेंचं भाषण झालं तेव्हा राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंशी हात मिळवला तसंच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे खांदे थोपटले. उद्धव ठाकरेंचं भाषण सुरु असताना राज ठाकरेंच्या चेह-यावर थोडी अस्वस्थता जाणवत होती. ती एका अनामिक काळजीची होती की काय हे समजायला मार्ग नव्हता. जेव्हा मेळावा उत्तरार्धात होता तेव्हा सर्वपक्षीय नेत्यांसोबत उभं राहाताना उद्धव ठाकरे सातत्यानं राज यांच्याशी बोलत होते. कोपरा मारुन त्यांना काही ना काहीतरी सांगत होते. एवढं सगळं होणार आणि राज ठाकरे म्हणणार की आमच्या बॉडीलँग्वेजची चर्चा होणार नाही तर असं कसं होणार?
उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर उत्सवी भाव होते. तर राज ठाकरेंच्या चेह-यावर मेळाव्याच्या आयोजनाचा ताण स्पष्टपणे दिसत होता. पण एक मात्र खरं की मराठी आणि मराठीच्याच मुद्यावर दोघा भावांनी एकजूट दाखवायची हा ठामपणा दोघांमध्येही दिसत होता.