Raj Thackeray And Uddhav Thackeray Together : उद्धव ठाकरे यांचा वाढदिवसा दिवशी महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. राज ठाकरे यांनी 2012नंतर प्रथमच 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर राज ठाकरे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची धकधक वाढली. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत देखील एकनाथ शिंदे यांना डिवचले. शिवसेना शिंदेंची कशी होऊ शकते हे सांगणारा महाराष्ट्रातील पहिला नेता असं म्हणत संजय राऊतांनी डायरेक्ट या नेत्याचे नाव घेतले.
राज ठाकरे यांनी काल केलेल्या फेसबुक पोस्टचा धागा पकडत खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय. शिवसेना शिंदेंची कशी होऊ शकते हे सांगणारे राज ठाकरे पहिले नेते होते असं राऊतांनी म्हटलंय. तसंच एकनाथ शिंदे, अजित पवारांकडे चोरीचा माल असून तो कधीही जप्त होऊ शकतो असा हल्लाबोलही राऊतांनी केला. एकनाथ शिंदे यांनी पक्ष चोरला… अमित शहा यांनी दरोडा टाकून एकनाथ शिंदे यांच्या कडे सुपूर्त केला तेव्हा ही त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे यांची कशी होऊ शकते असा सवाल केला होता.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्षात फूट पडली. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट पडले आहेत. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर खरी शिवसेना कुणाची यावरून दोन्ही बाजूने सातत्याने दावे प्रतिदावे केले जात आहेत. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना दिलं असलं तरी सुप्रीम कोर्टात अजूनही लढाई सुरु आहे. अशातच आता शिवसेना नेमकी कुणाची यावर राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे.
शिवसेना शिंदेंची कशी होऊ शकते असं सागणारे राज ठाकरे हे पहिले नेते असल्याचे वक्तव्य संजय राऊतांही केले आहे. 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंचा थेट शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख केला. माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या.... अशी पोस्ट राज ठाकरे यांनी केली आहे. याआधीही एकनाथ शिंदेंनी शिवसेनेवर दावा करणं चुकीचं आहे असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं. त्या अनुषंगाने आता त्यांनी केलेला उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षप्रमुख उल्लेख महत्त्वाचा मानला जात आहे. दरम्यान, याबाबत उद्धव ठाकरेंना विचारले असता त्यांनी शिवसेना एकच असल्याचं सांगत एकनाथ शिंदेंना डिवचलंय. शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र राज यांच्या फेसबुक पोस्टमधील बाळासाहेबांची मातोश्री उल्लेखावर बोट ठेवत उद्धव ठाकरेंना डिवचल आहे.