Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

12 वर्षाच्या मुलाकडून महिलेचे 1 लाख 50 हजारांचे दागिने परत, अशी घडली होती घटना

मुथुट फायनान्स कंपनीत त्या पोहोचल्या तेव्हा त्यांना आपली बॅग गहाळ झाल्याचे लक्षात आले. त्या दोघीनी तात्काळ गोंदिया शहर पोलीस स्टेशन गाठले.

12 वर्षाच्या मुलाकडून महिलेचे 1 लाख 50 हजारांचे दागिने परत, अशी घडली होती घटना

गोंदिया : गोंदिया येथील श्रीनगरमध्ये राहणारे गिता राजु तिडके ( 29 वर्ष ) आणि कोमल मधुकर तिडके ( 20 वर्षे ) या दोघी त्यांच्या राहत्या घरातून प्लेझर मोटर सायकलवरुन मुथुट फायनान्स कंपनीत सोने गहाण ठेवण्यासाठी निघाल्या होत्या. 

प्रवासादरम्यान 2 तोळ्याचे सोन्याची 2 मंगळसुत्र, 3 जोड सोन्याचे रिंग, 1 सोन्याचे पदक असा एकूण 1 लाख 50 हजार रुपये किंमतीचे दागिने, आधार कार्ड, पॅन कार्ड अशा वस्तू असलेली त्यांची प्लास्टीक बॅग रस्त्यात कोठेतरी पडली. 

मुथुट फायनान्स कंपनीत त्या पोहोचल्या तेव्हा त्यांना आपली बॅग गहाळ झाल्याचे लक्षात आले. त्या दोघीनी तात्काळ गोंदिया शहर पोलीस स्टेशन गाठले. तेथे त्यांनी रीतसर तक्रार नोंदविली.

पोलीसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून लागलीच कॅरीबॅगचा शोध घेण्याच्या कार्यवाहीस सुरुवात केली. इकडे ही सोन्याचे दागिने असलेली बॅग पोद्दार इन्टरनॅशनल स्कुलमध्ये वाहन चालक म्हणून कार्यरत असलेले महेन्द्र उर्फ रिंकु भोलाराम आगळे यांचा 12 वर्षांचा मुलगा निकुंज याला घरासमोरील रस्त्यावर आढळून आली.

निकुंज याने ती बॅग उचलून आई कविता यांना दिली. महेन्द्र नोकरीवरुन घरी परत आल्यानंतर निकुंजने त्यांना घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी त्यातील आधार कार्डच्या आधारे सदर महिलेची माहिती काढली. तसेच त्यांची कोणती वस्तू गहाळ झाली आहे का याची विचारणा केली.

मुलगा निकंज याला मिळालेल्या वस्तू त्या महिलेचीच असल्याची त्यांना खात्री पटली. त्यामुळे महेंद्र यांनी त्या महिलेच्या घरी जाऊन ते दागिने व इतर सामान त्यांना परत केले. महेंद्र आणि त्यांचा मुलगा निकुंज यांनी दाखविलेल्या या प्रामाणिकपणाबद्दल गोंदिया शहर पोलिसांनी महेन्द्रचा सत्कार करून कौतुक केलं. 

Read More