Maharashtra weather rain alert: एकीकडे कोकण, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात आधीच पावसाने हजेरी लावली होती, तर दुसरीकडे विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशात मात्र पाऊस लांबलेला होता. मात्र गुरुवारी रात्रीपासून हवामानात मोठा बदल झाला असून, या भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांत रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाले भरून वाहू लागले आहेत. काही नद्यांना पूर येऊन काही गावांचा संपर्क तुटल्याचीही माहिती आहे. वाशिम, अकोला, यवतमाळ, वर्धा आणि बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये गुरुवारी दिवसभर संततधार पाऊस कोसळत राहिला. गेल्या काही दिवसांपासून शहर आणि जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असून, आता हवामानात उष्णतेची चाहूल लागली आहे. शहरात दिवसभर कधी ऊन तर कधी ढगाळ असं वातावरण आहे. कमाल तापमानात वाढ झाल्याने उष्माही जाणवू लागला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, 2 जुलैपर्यंत शहरात हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. मात्र, घाटमाथ्यावर अधूनमधून मुसळधार पावसाचा धोका कायम असल्याचं सांगितलं जात आहे.
जिल्ह्याच्या काही भागांमध्ये, विशेषतः ताम्हिणी, लोणावळा, भोर आणि कुरवंडे परिसरात याआधी जोरदार पावसाची नोंद झाली होती. काही ठिकाणी एका दिवसात 100 मिमी पेक्षाही अधिक पावसाची नोंद झाली. सध्या मात्र या भागांतील पावसाचा जोर कमी झाला आहे. शहरात दिवसभरात कुठे एखादी सर तर कुठे उजळ ऊन दिसत आहे. परिणामी, शिवाजीनगरसारख्या भागात कमाल तापमान 30 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. यामुळे उष्णतेची तीव्रताही वाढली आहे.
हवामान विभागाच्या नोंदीनुसार, गुरुवारी संध्याकाळी साडेपाचपर्यंत कुरवंडे येथे 56.5 मिमी, भोरला 27.5 मिमी, निमगिरीला 14 मिमी पाऊस पडला. तर रात्री साडेआठपर्यंत चिंचवडला 2 मिमी, लवळेला 3.5 मिमी, कोरेगाव पार्कला 1 मिमी, आणि शिवाजीनगरला केवळ 0.3 मिमी पावसाची नोंद झाली.
भारतीय हवामान खात्याच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, मुंबई व परिसरात (MMRDA) 27 जून रोजी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबई शहरासह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि इतर उपनगरीय भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.