Kolhapur Breaking News: 'अॅक्सिस बँके'च्या एटीएममध्ये बनावट नोटा भरून फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा कोल्हापूरच्या गडहिंग्लज पोलिसांनी माग काढत थेट बांगलादेश सीमेपर्यंत छडा लावला आहे. या कारवाईत मलिक अफसरअली शेख (32) आणि टोनी जहरुद्दीन शेख (23) या दोघांना अटक करण्यात आली आहे. हे दोघेही पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील फराका तालुक्यातील परसुजापूर येथील रहिवासी आहेत.
17 जून रोजी गडहिंग्लजमध्ये आकाश रवींद्र रिंगणे या तरुणाने एटीएममध्ये 500 रुपयांच्या 35 बनावट नोटा भरल्याची घटना उघड झाली. यावरून सुरू झालेल्या तपासात पोलिसांनी धागेदोरे पकडत एकामागून एक 10 जणांपर्यंतची साखळी शोधून काढली. आकाशच्या अटकेनंतर नितीन कुंभार, अशोक कुंभार, दिलीप पाटील, सतीश कणकणवाडी, भरमू कुंभार आणि अक्षय कुंभार यांची नावं समोर आली. यातील मुख्य सूत्रधार अशोक कुंभारची तुरुंगात असताना टोनीच्या वडिलांशी ओळख झाली, आणि त्यातूनच बनावट नोटांची तस्करी सुरू झाली, अशी माहिती तपासात उघड झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या बनावट नोटांची छपाई बांगलादेशात होते. त्यानंतर ती सीमेवरून पार्सल स्वरूपात फेकली जातात आणि त्यांना भारतीय हस्तक उचलून देशांतर्गत वितरित करतात. ही बनावट नोटांची खेप थेट बेंगळुरपर्यंत पोहोचवली जात होती. या रॅकेटमध्ये ओडिशाचा तापसकुमार प्रधान देखील सामील असल्याने हे संपूर्ण जाळं महाराष्ट्र, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या राज्यांपर्यंत पसरले आहे. त्यामुळे पोलिसांना या तिन्ही राज्यांत जाऊन आरोपींना पकडावे लागले.
या बनावट नोटांमागे आर्थिक गणितंही धक्कादायक आहेत. 1 लाख रुपयांच्या बनावट नोटा बाजारात उतरवल्यावर आरोपींना 60 हजार रुपये मोबदला मिळत असे. यातील 40 हजार रुपये बनावट नोटा पुरवणाऱ्याला पाठवले जात आणि 20 हजार हे हस्तकाकडे राहत असत. बहुतांश व्यवहार हे ऑनलाइन पद्धतीने केले जात होते. तपासात आढळून आलं की, या 10 संशयितांकडून 16.88 लाख रुपयांचा ऑनलाइन व्यवहार झाला आहे. याचा अंदाज लावला तर सुमारे 35 लाख रुपयांच्या बनावट नोटा या गटाने चलनात आणल्या आहेत.
जर आकाश रिंगणे एटीएममध्ये पैसे भरताना पकडला गेला नसता, तर ही फसवणूक अजून किती काळ सुरु राहिली असती, याचा विचार केला तरी धडकी भरते. या घटनेने पोलिस यंत्रणेसमोर चलन सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उभे केले आहेत.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आतापर्यंत 10 आरोपी अटकेत असून, 4 आरोपींचा शोध सुरू आहे. हे चारजण सापडल्यानंतर संपूर्ण रॅकेटचा शेवटचा टप्पा पूर्ण होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईत पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक सागर पाटील, उपनिरीक्षक रमेश मोरे, तसेच कर्मचारी रामदास किल्लेदार, दादू खोत, अरुण पाटील, युवराज पाटील आणि प्रशांत शेवाळे यांच्या पथकाने मोठी भूमिका बजावली.