Prashant Koratkar Rahul Solapurkar Issue: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेसंदर्भात केलेल्या विधानावरुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार तसेच प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपाला मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे, असं म्हणत टीका केली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना, "मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे आणि मुंबईवरचा मराठी ठसा पुसून टाकायचा आहे हे काही लपवून राहिलेलं नाही," असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. "मुंबईचा महत्व कमी करायचं आहे. मराठी माणसाची विभागणी करायची आहे या सर्व गोष्टी करून झालेल्या आहेत," असंही राऊत म्हणाले.
"मंगल प्रभात लोढा, गुंडेच्या बिल्डर हे भाजपचेच आहेत अशी अनेक नाव आहेत. हे भाजपचे अर्थ पुरवठादार आहेत. मुंबईची भाषा मराठी नाही हे छातीठोकपणे सांगणं हा पुढच्या रणनीतीचा भाग आहे. इतर राज्यांमध्ये जाऊन हिंदी बोलू शकता का?" असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. "भैय्याजी जोशी यांनी माफी मागायला हवी विधानसभेत या संदर्भातील ठराव मंजूर करून घेतला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी थातूरमातूर उत्तर दिले भैय्याजी जोशी यांचा निषेध केला नाही," असंही राऊत म्हणाले.
"प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा अपमान केला तो का सापडत नाही त्याला अभय कोणी दिलं? त्याचा वावर हा देशाच्या गृहमंत्र्यांपासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आहे त्या चील्लरला तुमचाच अभय आहे," असं राऊत यांनी म्हटलं आहे. "राहुल सोलापूरकर हा आरएसएसच्या कार्यालयात जाऊन बैठका घेतो. राहुल सोलापूरकरवर काय कार्यवाही केली सरकारने? त्याला अटक केली पाहिजे राजद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे. सरकार मूग गिळून का बसलं आहे? तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत म्हणून?" असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.
अनिल परबांनी स्वत:ची तुलना छत्रपती संभाजी महाराजांशी केल्याच्या सत्ताधाऱ्यांच्या आरोपावर राऊतांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना, "ईडीवाले याच वास्तूमध्ये माझा छळ करत होते. इथूनच अटक करून मला तुरुंगात नेलं. अनिल परब यांना त्रास झाला. रवींद्र वायकर यांच्यावर दबाव टाकला होता. जे घाबरले नाहीत ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी राजे आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श बाळगला ते शरण गेले नाहीत. जे नामर्द होते ते पळून गेले त्यावर काय चर्चा करायची?" असा उलट सवाल राऊतांनी विचारला.