Bala Nandgaonkar Reaction: महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून ठाकरे कुटुंबातील चुलत बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय. 5 जुलै 2025 रोजी मुंबईत एक संयुक्त मेळावा आयोजित केला आहे. हा मेळावा मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संरक्षणासाठी आहे, ज्याला ‘मराठी विजय दिवस’ म्हणून संबोधले जात आहे. दरम्यान मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी यावर अत्यंत महत्वाची प्रतिक्रिया दिलीय. या मेळाव्यासाठी आम्ही एकनाथ शिंदेंनाही निमंत्रण दिल्याचे ते म्हणाले.
उद्याचा मेळावा महाराष्ट्राच्या राजकारणातला टर्नींग पॉईंट ठरावा.मुंबई महापालिकेवर आता बाजारी ब्रॅन्ड नाही; ठाकरी विचार दिसेल. ठाकरे हा ब्रॅन्ड नाही तर ठाकरे हा विचार आहे. ठाकरे विचार उद्या दिसणार आहे. ब्रॅन्ड बाजारी असतो; विचार आतुन येतो, असे बाळा नांदगावकर म्हणाले. महापालिका निवडणूकीत यावेळी नक्कीच वेगळं घडेल; मराठी माणूस ठाकरेंच्या विचारांचा विचार करेल. 2 बंधुंमध्ये एकमेकांप्रती विश्वास द्रुढ होतोय. बाळासाहेबांना दोन ठाकरे बंधुंना व्यासपिठावर एकत्र बघुन आनंदच झाला असता. बाळासाहेब असते तर कुणी मराठीबाबत असा निर्णय घेण्याची हिंमतच झाली नसती; अशी वेळच बाळासाहेबांनी येऊ दिली नसती, असे नांदगावकर म्हणाले.
ठाकरेंच्या घरामध्ये असं काही होईल असं कुणाला वाटलं नव्हतं पण झालं. मनसेही आता बरीच पुढे आलीय पण उद्याच्या मेळाव्यातून महाराष्ट्राला बरंच काही मिळेल. भविष्यात मूळ शिवसेनेची त्रीशक्ती (शिंदेसकट) एकत्र येऊ शकते का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर सामान्य मराठी माणसासाठी कुणी सोबत येत असेल तर सर्वांचंच स्वागत असल्याचे ते म्हणाले. ठाकरेंच्या पक्षाचे तीन भाग झाले. मराठी माणसाची ही शक्ती विभागली गेली. मराठी माणसासाठी या मेळाव्याकरता आम्ही शिंदेंनाही बोलावलंय. निमंत्रण सर्वांनाच असल्याचे ते म्हणाले. शेवटी हिंदुत्व आणि मराठी या एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत; हिंदुत्व आणि मराठीसाठी आम्ही त्वेषानंच पेटुन उठतो. शिवसेनेचे नेते आणि मनसेचे नेते इतर प्रसंगी एकत्र येतात. पण उद्याचा प्रसंग आमच्यासाठीही विशेष आहे. ठाकरे कुटुंबाचे वारसदार उद्या येणार त्यामुळे उद्याचा मेळाव्याकडे लक्ष असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत प्राथमिक शाळांमध्ये हिंदी भाषेला तृतीय भाषा म्हणून अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला उद्धव आणि राज ठाकरे यांनी तीव्र विरोध केला. दोघांनी सुरुवातीला 6 आणि 7 जुलै रोजी स्वतंत्र मोर्चे काढण्याची घोषणा केली होती. मात्र, गुरुवारी (27 जून 2025) राज ठाकरे यांनी शिवसेना (यूबीटी) खासदार संजय राऊत यांच्याशी संपर्क साधून एक संयुक्त मोर्चा काढण्याचा प्रस्ताव मांडला. उद्धव ठाकरे यांनी तात्काळ याला होकार दिला, आणि 5 जुलै रोजी एकत्रित मेळाव्याचे आयोजन निश्चित झाले. हा मेळावा मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संरक्षणासाठी असल्याचं म्हटलं जातंय. या संयुक्त मेळाव्यामुळे उद्धव आणि राज ठाकरे यांच्या राजकीय युतीच्या चर्चांना उधाण आले आहे. आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा एकत्र येणे महत्त्वाचे मानले जात आहे. शिवसेना (यूबीटी) गेल्या 25 वर्षांपासून बीएमसीवर वर्चस्व राखत आहे, पण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पक्ष आणि निवडणूक चिन्हावर दावा सांगितल्याने ठाकरे बंधूंसमोर आव्हान आहे. ठाकरे बंधूंची एकता मराठी माणसाच्या मतांना एकत्र आणू शकते, ज्याचा फायदा बीएमसी निवडणुकीत होऊ शकतो, असे काही राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
सरकारने हिंदी अनिवार्यतेचा निर्णय मागे घेतल्यानंतर ठाकरे बंधूंनी याला आपली विजय म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला या मेळाव्याला राजकीय रंग नसून, तो मराठी माणसाच्या एकतेचा संदेश देणारा असेल, असे दोन्ही पक्षांनी स्पष्ट केले आहे. कोणत्याही पक्षाचे झेंडे या मेळाव्यात नसतील, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.