Uddhav Thackeray and Raj Thackeray Alliance: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकाच गोष्टींची चर्चा आहे ती म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीची. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही ठाकरे बंधू युतीसाठी तयार असल्याचं बोललं जात असतानाच मातोश्रीवर मात्र मनसे पदाधिकाऱ्याने शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळं युतीत खोडा पडला तर नाही, अशी शंका व्यक्त केली जात आहे. मात्र त्याचवेळी शिवसेनेत प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्याबाबत मनसेने मात्र वेगळाच दावा केला आहे.
अंधेरी पूर्वमधील मनसेचे पदाधिकारी वैभव दळवी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हस्ते त्यांना शिवबंधन बांधण्यात आलं आहे. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब आणि इतर नेतेदेखील हजर होते. वैभव दळवी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका कोणत्याही वेळेत जाहीर होऊ शकते. अशावेळी ठाकरेंकडूनही पक्षाची बांधणी करण्यात येत आहे. वैभव दळवी हे मनसेचे अंधेरी पूर्वेचे पदाधिकारी होते. गेल्या काही दिवसांपासून ते शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा सुरू होती. मात्र मनसे-शिवसेना युतीबाबत चर्चा असताना वैभव दळवीचा पक्ष प्रवेश हा अनेकांच्या भुवया उंचावणारा होता.
एकीकडे वैभव दळवी यांच्या शिवसेनेतील जाहीर प्रवेशामुळं चर्चा रंगली असताना मनसेने मात्र ते आमचे कार्यकर्ते नाहीच असं म्हटलं आहे. त्यामुळं वैभव दळवी नेमक्या कोणत्या पक्षाशी संबंधित होते, अशा चर्चाही रंगताना दिसत आहेत. मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांनीही पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत गेलेले वैभव दळवी हे आमचे कार्यकर्ते नाहीत. 2014 साली त्यांनी भाजपचं काम केल्यानंतर त्याचवेळी त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती, असं स्पष्टीकरण मनसेने दिले आहे.
पक्षप्रवेश केलेला व्यक्ती 2014-15 साली पदाधिकारी होता. तो मनसेचा माजी पदाधिकारी होता. गेल्या 10-15 वर्षांपासून तो अॅक्टिव्हदेखील नव्हता. त्यामुळं आमचं लेबल लावून त्याने पक्षप्रवेश का केला हे कळायला मार्ग नाही. वैभव दळवी हे 2014-15 साली पदाधिकारी होते नंतर त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती, अशी माहिती मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी दिली आहे.