Ambadas Danve Uddhav Thackeray : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने त्यांचा आज निरोपसमारंभ विधानभवनात पार पडला. यावेळी खास फोटो सेशन करण्यात आले. फोटोसेशनमध्ये सर्व एका फ्रेममध्ये तरीही एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या हालचालींनी लक्ष वेधले. फोटो सेशनच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे थेट आमने सामने आले. एकत्र फोटो काढला तरी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात काहीच संवाद झाला नाही.
अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाच्या या फोटो सेशन दरम्यान एक अतिशय बोलकी घडामोड घडली. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. फोटोसेशनसाठी विधानभवनाच्या आवारात खुर्च्या मांडण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, निलम गोऱ्हे यांच्यासह सर्वजण जमले होते. सर्व नेते आसनस्थ झाले होते. यावेळी उद्धव ठाकरे येथे आले. उद्धव ठाकरे आल्यानंतर सर्वजण उभे राहिले.
उद्धव ठाकरे सर्वांना नमस्कार करत पुढे आले. मात्र, उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना टाळले. यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांकडे पाठ करुन उभे राहिले. यानंतर उद्धव ठाकरे यांना बसण्याची विनंती करत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांच्या बाजूची खुर्ची देण्याचा प्रयत्न केला. मात्र, उद्धव ठाकरे यांनी निलम गोऱ्हे यांच्याशी बोलत ती खर्ची टाळली. शेवटी एकनाथ शिंदे यांच्या बाजूला बसणे देखील उद्धव ठाकेर यांनी टाळले.
दरम्यान, विधानपरिषदेत सोन्याच्या चमच्यावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळाले. अंबादास दानवें सोन्याचा जन्म सोन्याचा चमचा घेऊन झाला नाही असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं..तोच धागा पकडून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर पलटवार केला. अंबादास दानवेंनी भरलेल्या ताटाशी कधीच प्रतारणा केली नाही. भरलेलं ताट तुम्ही कधीच हिसकावून घेतलं नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले तर सोन्याच्या चमचातून तुम्हाला ज्यांनी वाढलं त्यांच्या घराचे वासे तुम्ही मोजले नाहीत असं अनिल परब सांगत शिंदेंना टोला लगावला.