Uddhav Thackeray Delhi Visit INDIA : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच बिगुल वाजणार आहे. त्यामुळे मविआ आणि महायुतीकडून मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल झाले आहेत. महाराष्ट्रात मविआ कशा पद्धतीनं निवडणुका लढवणार याबाबत बैठकीत रणनीती ठरवण्यात येणार आहे. तसंच ठाकरे बंधूंच्या युतीबाबत देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
एकीकडे एकनाथ शिंदे दिल्ली दौ-यावर असताना दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौ-याची देखील जोरदार चर्चा सुरू आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय. या दिल्ली दौ-यानंतरच राज्यात महाविकास आघाडीची आगामी निवडणुकीतील रणनीती ठरणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, राज ठाकरेंसोबत निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीबाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा होण्याची देखील शक्यता आहे..
उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौ-यावर आहेत. रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरेही सोबत आहेत. विधानसभेनंतर पहिल्यांदाच इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक होतेय. दरम्यान या बैठकींसाठीच उद्धव ठाकरे दिल्लीत गेल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केले. तर ठाकरेंच्या दिल्ली दौ-यावरून एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना टोला लगावला आहे. उद्धव ठाकरेंनी दिल्लीत शरद पवारांची देखील भेट घेतली आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार इंडिया आघाडीच्या बैठकीतसहभाग घेणार आहेत. आगामी पालिका निवडणुकीचं धोरण ठरवण्यासाठी ठाकरे, पवार दिल्लीत गेल्याचं शशिकांत शिंदेंनी म्हटलं. तर ठाकरे हे काँग्रेसच्या तालावर नाचतात अशी खोचक टीका उदय सामंतांकडून करण्यात आली.
राज्यात आगामी पालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात आलीय. दरम्यान निवडणुका कशा लढवायच्यात यावर इंडिया आघाडी दिल्लीत चिंतन करणार आहे. यासाठी उद्धव ठाकरे देखील दिल्लीत पोहोचले आहेत. त्यामुळे मविआ राज्यात एकत्र लढणार की स्वबळावर हे चित्र आगामी काही दिवसात स्पष्ट होण्याची शक्यता आहे.