Uddhav Thackeray Meeting With Party MP: महाराष्ट्रामध्ये पुढील काही काळामध्ये कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची घोषणा होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून, लवकरच निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, 2024 च्या नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर अद्याप एकही बैठक न घेतलेल्या इंडिया आघाडीची आता अखेर बैठक होत आहे.
इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दिल्लीत आहेत. 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी ते दिल्लीत दाखल झाले. एका बाजूला मनसे-शिवसेना युतीची चर्चा रंगत असताना, दुसऱ्या बाजूला ठाकरे यांची ही दिल्ली भेटही चर्चेचा विषय ठरत आहे. दिल्लीत (Delhi) दाखल झाल्यानंतर बुधवारी रात्री त्यांनी ठाकरे गटाच्या लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत ठाकरेंनी आपल्या खासदारांना काही कानमंत्र दिलेत.
दिल्लीतील 15 सफदरजंग लेन येथील खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री शिवसेनेच्या लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची एकत्रित बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. "सत्ता हाच मोदी सरकारचा अजेंडा आहे, त्यांना जनहिताशी काहीही देणंघेणं नाही," असा घणाघात ठाकरेंनी केला. "शिवसेनेचा जन्मच जनहितासाठी लढा देण्यासाठी झाला आहे. तुम्ही संसदेत जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घ्या आणि सरकारला सळो की पळो करून सोडा," अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी खासदारांना स्पष्ट आदेश दिला.
सकाळी 11: 15, सफदरजंग लेन येथे उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतील.
दुपारी 12.30 : उद्धव ठाकरे संसदेत जातील! संसदेतील शिवसेना कार्यालयाला भेट देतील!
दुपारी 2.30: संजय राऊत यांच्या 15, सफदरजंग लेन निवासस्थानी जातील!
सायंकाळी 7: इंडिया अलायन्स डिनरला उपस्थित राहतील.
नक्की वाचा >> ‘शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीये’; भाजपा- शिंदेंची सेना आमने-सामने, महायुतीचं वाढणार टेन्शन
ठाकरे कुटुंब बुधवारी सायंकाळी शरद पवारांना त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन भेटले. शरद पवारांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन याची माहिती दिली. "आज माझ्या दिल्ली येथील निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्यांच्या सुविद्य पत्नी रश्मी उद्धव ठाकरे, आमदार आदित्य उद्धव ठाकरे ह्यांनी सदिच्छा भेट घेतली. या प्रसंगी खासदार सुप्रिया सुळे, खासदार संजय राऊत, खासदार फौझिया खान, खासदार अमोल कोल्हे, खासदार संजय दिना पाटील, खासदार निलेश लंके, खासदार भास्कर भगरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार बजरंग सोनवणे, आमदार मिलिंद नार्वेकर व सलील देशमुख हे सहकरीदेखील आवर्जून उपस्थित होते," असं शरद पवारांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.