Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance: उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे राजकीय दृष्ट्या भविष्यात एकत्र येणार की नाही याबद्दलचं गूढ अद्याप कायम आहे. असं असतानाच तीन दिवसाच्या पक्ष अधिवेशनामध्ये राज ठाकरेंनी पुढचं पुढे बघू असं म्हणत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होतील तेव्हा निर्णय घेऊ असं विधान केलं. त्यामुळे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार नाहीत, अशी चर्चा जोर धरु लागली आहे. असं असतानाच आता ठाकरेंच्या युतीसंदर्भात वेगवेगळ्या विधानांमुळे मागील महिन्याभरापासून चर्चेत असलेले उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या नव्या भूमिकेवर आपलं मत व्यक्त केलं आहे.
मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन ठाकरे बंधू एकत्र आले. उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे राजकीय युती करणार का? असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला. मात्र, मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येण्याचं ठरलं होतं. ठाकरेंच्या राजकीय युतीबाबत अजून निर्णय नाही, अशी राज ठाकरेंच्या मनसेची भूमिका असल्याचे समजते. मनसेतील वरिष्ठ सूत्रांकडून 'झी 24 तास'ला ही माहिती दिली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या राजकीय युतीबाबत अजून निर्णय झाला नसल्याचं मनसेतून सांगण्यात आलंय. अजून राजकीय युती झाली नसल्याचं सांगून मनसेनं शिवसैनिकांची अस्वस्थता वाढवली आहे.
मराठीच्या मुद्यावरून उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येऊन दहा दिवस लोटल्यानंतरही दोघांनी एकत्र येण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. 'एकत्र आलो आहोत, एकत्र येण्यासाठी' असे जाहीरपणे म्हणणारे उद्धव ठाकरे यांनीही आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तर जाहीर होऊ द्या मग पाहू असा पवित्रा घेतला आहे. राज ठाकरे यांनी या मुद्यावर मौन बाळगले असून या युतीसंदर्भातील संदिग्धता अधिक बळावत आहे. अशातच आता राऊत यांनी आपली भूमिका मांडली आहे.
पत्रकारांनी राज आणि उद्धव यांच्या युतीसंदर्भातील संभ्रमावस्थेतील भूमिकेबद्दल राऊत यांना विचारलं असता त्यांनी, "मी काय उत्तर द्यायला पाहिजे मी तसे उत्तर देतो," असं विधान केलं. राज ठाकरेंनी निवडणुका येतील तेव्हा बघू अशी भूमिका घेतल्याचा संदर्भ देत राऊत यांनी, "राज ठाकरे यांचे काय चुकले?" असा सवाल केला. "तुम्ही जे वक्तव्य करीत आहात त्यांनी ते कॅमरासमोर बोलले का? अनौपचारिक आम्ही पण बोलतो. औपचारिक जे बोलायचे ते आम्ही लवकरच बोलू , आम्ही आशावादी आहोत," असं राऊत म्हणाले. "महाराष्ट्र हिताचा निर्णय घ्यायचा तो राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र बसून निर्णय घेतील. कार्यकर्त्यांच्या पावसाला आम्ही वेगळी दिशा देऊ, त्यांना योग्य दिशा देऊ" असं राऊत यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावरुन प्रश्न विचारला असता राऊत यांनी, "त्यात चुकीचे काय?" असा सवाल करताना, "उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची विधाने सकारात्मक आहेत," असं उत्तर दिलं.