Uddhav Thackeray Shivsena Allegations On Shrikant Shinde: माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळात देण्यात आलेल्या कंत्राटाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत. याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच त्यांचे खासदारपुत्र श्रीकांत शिंदेंवर निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत. तानाजी सावंत यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या साफसफाईसाठी दिलेल्या 3 हजार 190 कोटींच्या कंत्राटामध्ये घोटाळा असून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे या घोटाळ्याचे प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे. एवढ्यावरच न थांबताच थेट श्रीकांत शिंदेंवरही गंभीर आरोप केले आहेत.
"राज्यात आदिवासी पाड्यांवर आरोग्य सुविधा नाहीत. गरोदर महिलांना चादरी घोंगडीचा पाळणा करून तालुक्याच्या ठिकाणी न्यावे लागते. त्या प्रवासात त्या महिलांची वाटेतच प्रसूती होते. त्यात बाळ आणि बाळंतिणीच्या जिवावर बेतते. विदर्भात लहान मुलांची प्रेते खांद्यावर टाकून घराकडे जातानाचे आई-बापाचे चित्र सरकारला विचलित करू शकले नाही. मृतदेहांना घेऊन जाण्यास रुग्णवाहिका उपलब्ध नाहीत, पण रुग्णवाहिका खरेदीच्या नावाखाली महाराष्ट्रात 10 हजार कोटींचा घोटाळा झाला," असं 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे.
रुग्णवाहिका घोटाळ्याचं श्रीकांत शिंदेंशी कनेक्शन असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे. "सुमित फॅसिलिटीज या कंपनीशी शिंदे पुत्राचे साटेलोटे असल्याने याच कंपनीला ‘टेंडर’ मिळावे असा दबाव आला व मूळ 800 कोटींचे हे टेंडर 10 हजार कोटींपर्यंत वाढवून महाराष्ट्राच्या तिजोरीची लूट केली. या व्यवहारात किमान सहा हजार कोटींची कमिशनबाजी झाली ती कुणाच्या घशात गेली?" असा सवाल विचारण्यात आला आहे.
"आरोग्य व्यवस्थेच्या माध्यमातून राज्याची तिजोरी पोखरण्याचे काम शिंदे यांनी पोसलेल्या खेकड्यांनी केले. हाच पैसा पुढे विधानसभा निवडणुकीत आला व मतदारांना घरटी पाच-दहा हजार पाठवून मते विकत घेण्यात आली. या भ्रष्टाचारामुळे आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले. अनेक गरीबांना औषधोपचार मिळाले नाहीत. रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी तडफडून प्राण सोडले असतील, पण भ्रष्टाचाराच्या पैशांवर कोणी निवडणुका लढवल्या तर कुणाची पोरेटोरे खास विमानाने मौजमजेसाठी ‘बँकॉक’ला रवाना झाली," असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेनं अग्रलेखातून एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंतांवर निशाणा साधला आहे.
"शिंदे हे फडणवीस - 1 सरकारमध्ये काही काळ आरोग्य मंत्री होते व स्वतः मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी आपल्या तानाजीला आरोग्य मंत्री केले. त्या दोघांनी मिळून राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढले. औषध खरेदीत घोटाळा झाला, पण वैद्यकीय उपकरणांपासून रुग्णवाहिका सेवेपर्यंत सर्वत्र खाऊबाजीच सुरू झाली. शिंदे यांचे चिरंजीव व त्यांची एक टोळी वैद्यकीय मदत केंद्र चालवीत होती आणि त्यांच्याच माध्यमातून आरोग्य सेवेतले सर्व आर्थिक व्यवहार झाले. त्यामुळे या आरोग्य घोटाळ्याचे सूत्रधार हे तानाजी सावंत असले तरी घोटाळ्याचे लाभार्थी तेव्हा ‘वर्षा’ बंगल्यावर होते," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.