Uddhav Thackeray Raj thackeray Morcha Planning: उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येणार असून 5 जुलै रोजी वरळीतील एनएससीआय डोममध्ये विजयी मेळाव्याच्या मंचावर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसतील. हिंदी भाषा पहिल्या इयत्तेपासून शिकवण्यासंदर्भातील शासन आदेश रद्द करण्यासाठी दोन्ही सेनांनी 5 जुलै रोजी मोर्चा कढण्याचं आवाहन केलेलं. मात्र त्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील दोन्ही शासन आदेश मागे घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर आता नियोजित तारखेलाच ठाकरे बंधू एकत्रितपणे विजयी मेळावा घेणार आहेत. हा मेळावा कसं असणार आहे याची माहिती समोर आली आहे.
ठाकरे बंधुंच्या विजयी मेळाव्याच्या नियोजनासाठी मागील काही दिवसांपासून दोन्ही सनेंचे नेते एकमेकांना भेटत आहे. बुधवारी रात्री मनसे-शिवसेना- ठाकरे नेत्यांची संयुक्त बैठक वरळी डोम येथे पार पडली. या बैठकीत मेळावा कसा व्हावा यासंबंधी महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीला मनसेकडून बाळा नांदगांवकर, संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई उपस्थित होते. तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल परब, सुनिल शिंदे हे नेते उपस्थित होते. या बैठकीत मेळाव्याची रुपरेषा निश्चित करण्यात आली. 5 जुलैच्या ठाकरे बंधुंच्या विजयी मेळाव्याचा मास्टर प्लान 'झी 24 तास'च्या हाती लागला आहे. नेमका कसा असणार हा मेळावा पाहूयात...
1 > मेळाव्यापूर्वी ठाकरे बंधुंच्या आगमनापासून भाषणापर्यंतची प्रत्येक गोष्टीची रंगीत तालीम शुक्रवारी केली जाणार आहे.
2 > मेळाव्यात केवळ ठाकरे बंधुंची भाषणे होणार आहेत. इतर पक्षांचे अध्यक्ष आल्यास केवळ पक्षाध्यक्षांचीच भाषणे होतील असं ठरलं आहे.
3 > व्यासपीठावर केवळ पक्षाध्यक्षांनाच स्थान दिले जाणार आहे. इतर सर्व नेते खाली व्यासपीठासमोर बसणार आहेत.
4 > दोन्ही ठाकरे बंधू आणि इतर सहकारी पक्षांचे अध्यक्ष आले तर ते अशी मोजकी भाषणं होतील. इतर नेत्याची भाषणे होणार नाहीत.
5 > संजय राऊत, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे हे देखील व्यासपीठाच्या खालीच असणार.
6 > सर्व नेत्यांचा सन्मान जपला जाईल अशी आसनव्यवस्था असणार आहे.
7 > मेळाव्याचा केंद्रबिंदु मात्र ठाकरे बंधुच राहणार आहेत.
8 > मुंबईत जिथे शक्य असेल तिथे एलईडी स्क्रीन लावल्या जाणार आहेत. विजयी मेळाव्याचं थेट प्रक्षेपण लोकांना पहाता येणार आहे.
9 > दोन्ही ठाकरेंचे पक्ष आणि त्यांचे नेते आपापला पक्षीय अहंकार (इगो) बाजूला ठेवून या मेळाव्यासाठी झोकून देऊन काम करतील असं ठरलं आहे.
10 > गर्दीचे नियोजन ही मेळाव्यातील दोन्ही पक्षांची संयुक्त जबाबदारी असणार आहे.
11 > दोन्ही ठाकरेंच्या पक्षांमधील नेत्यांच्या विशेष टीम तयार करुन जबाबदारीचं वाटप केलं जाणार आहे.
12 > वरळी डोममध्ये गर्दी झाल्यास डोमच्या गॅलरीही कार्यकर्त्यांसाठी खुल्या केल्या जाणार आहेत.
13 > वरळी डोम परिसरात मोकळ्या जागेत अतिरिक्त शेड टाकून बैठक व्यवस्था केली जाणार आहे.
14 > बॅनरबाजी, पोस्टर, घोषणाबाजीतून एकमेकांना डिवचले जाणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना केल्या जाणार आहेत.
15 > सोशल मिडीया, बॅनर; जाहिरातींद्वारे या मेळाव्याची जोरदार प्रसिद्धी केली जाण्याची जबाबदारीही दोन्ही पक्षांच्या विशेष टीमकडे सोपवण्यात आली आहे.