Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

...तर या सरकारमध्ये केवळ अजित पवारच खुश आहेत; ठाकरेंच्या सेनेचा एकनाथ शिंदेंना टोला

Eknath Shinde Ajit Pawar Funds Issue: "मुख्यमंत्र्यांचा रोख कुणाकडे होता व टेंडर रद्द होण्यामागे कोणाचे अदृश्य हात होते, हे आता लपून राहिले नाही."

...तर या सरकारमध्ये केवळ अजित पवारच खुश आहेत; ठाकरेंच्या सेनेचा एकनाथ शिंदेंना टोला

Eknath Shinde Ajit Pawar Funds Issue: "महाराष्ट्रातील फडणवीस, मिंधे, अजितदादा यांच्या महायुती सरकारमध्ये सध्या जोरदार नाराजीनाट्य रंगले आहे. पाशवी बहुमत असलेल्या सरकारमधील या लाथाळ्या, आरोप-प्रत्यारोप व रुसवे-फुगवे पाहून महाराष्ट्राच्या जनतेची फुकटात करमणूक होत आहे," असा टोला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं राज्यातील तीन पक्षांच्या सरकारच्या कामासंदर्भात बोलताना लगावला आहे. 'सामना'च्या अग्रलेखामध्ये, "मंत्रिमंडळातील मिंधे मंडळ अर्थखात्यावर म्हणजेच अजित पवारांवर नाराज आहे. ‘पैसा’ अर्थात ‘निधी’ हे नाराजीचे मुख्य कारण सांगितले जात आहे. म्हणजे जुन्याच आजाराने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. शिवसेना फोडताना व महाविकास आघाडीचे सरकार पाडताना मिंधे मंडळाची हीच नाराजी व तक्रार होती आणि ती आजही कायम आहे. नाराजीच्या त्याच मूळव्याधीने मिंध्यांचे मंत्री पुन्हा हैराण झाले आहेत. त्या वेळी मूळ शिवसेनेशी बेइमानी करताना मिंध्यांच्या लोकांनी अजित पवार यांनाच ‘व्हिलन’ ठरवले होते. मात्र तेच अजित पवार तुरुंगात जाण्याऐवजी मिंध्यांच्या पावलावर पाऊल टाकून सरकारमध्ये आले व अर्थमंत्रीदेखील झाले. मंत्रिमंडळातील सर्व खात्यांच्या नाड्या अर्थखात्याकडे, पर्यायाने अजितदादांकडे आल्या व दादांनी या नाड्या आवळून धरल्याने अनेकांचा जीव कासावीस झाला," असं म्हटलं आहे.

अजित पवारांना टार्गेट करण्यासाठीच...

"मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर निधीअभावी अस्वस्थ झालेल्या मंत्र्यांच्या नाराजीला तोंड फुटले. ‘दादा पैसेच देत नाहीत भाई’, असे रडगाणे घेऊन मिंधे गटाच्या मंत्र्यांनी म्हणे नाराजांच्या सरदाराची भेट घेतली. ‘सह्याद्री’ अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत निधीअभावी त्रस्त झालेल्या मंत्र्यांनी मिंध्यांसमोर अजित पवारांच्या तक्रारींचा पाढा वाचला. ‘‘अर्थमंत्री अजितदादा आमच्या खात्याच्या विकासकामांत खोडा घालत आहेत. अर्थखाते व अर्थमंत्री आम्हाला पैसे देणार नसतील तर आम्ही विकासकामे कशी करायची?’’ अशी तळमळ म्हणा की तगमग या मंत्र्यांनी व्यक्त केली. अजित पवारांना टार्गेट करण्यासाठीच ही बैठक झाली, असे सांगण्यात येते," असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.

साताऱ्यातील गाव गाठायचे आणि शेतातील स्ट्रॉबेरी मोजायच्या

"‘सह्याद्री’ अतिथीगृहावर झालेल्या या बैठकीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या गटातील सर्व मंत्र्यांच्या खात्यांचा स्वतंत्र आढावा घेतला. एकेका मंत्र्याला बोलावून त्यांच्या खात्यातील कामांची माहिती घेतली. तेव्हा ‘‘अजितदादा आमच्या खात्याला पैसेच देत नाहीत. मग कामे कशी होणार आणि कामे झाली नाहीत तर निवडणुकीला सामोरे कसे जाणार व लोकांना काय उत्तरे देणार?’’ असे प्रश्न जनहिताच्या मुद्द्यावर व्याकूळ वगैरे झालेल्या मंत्र्यांनी या बैठकीत मांडले. सगळ्यांच्या तक्रारींचे स्वरूप आणि ‘लक्ष्य’ एकच असल्याने या मुद्द्यावर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलून मार्ग काढू, अशी समजूत काढत नाराजांच्या सरदारांनी वेळ मारून नेली. वास्तविक महायुतीच्या सरकारमध्ये खुद्द मिंध्यांवरच तोंड दाबून बुक्क्यांचा मार सुरू आहे व पुन्हा या नाराजीची बोंब करण्याची सोयही राहिली नाही. त्यामुळे नाराज झाले की, साताऱ्यातील गाव गाठायचे आणि शेतातील स्ट्रॉबेरी मोजायच्या, हा नाराजीवरील अक्सीर तोडगा जसा मिंध्यांनी शोधून काढला तसाच काही तोडगा त्यांनी आपल्या सहकारी मंत्र्यांना दिला असेल तर सांगता येत नाही," असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे.

हा तमाशा नाइलाजाने सहन करावा लागणार

"घोडबंदर ते वसई या रस्त्याच्या कामातील तीन हजार कोटींची पेंड कोणत्या घोड्याने खाल्ली, यावर सध्या महाराष्ट्रात मोठी चर्चा सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात या मुद्द्यावरून महाराष्ट्र सरकारची मोठीच नामुष्की झाली. पेंड खाणारे टेंडर रद्द करावे लागले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तो निर्णय माझ्या काळातला नाही, म्हणून हात झटकले. मुख्यमंत्र्यांचा रोख कुणाकडे होता व टेंडर रद्द होण्यामागे कोणाचे अदृश्य हात होते, हे आता लपून राहिले नाही. महायुती सरकारमधील ही सुंदोपसुंदी, कुरघोड्या व नाराजीनाट्य यांचा जो काही शेवट व्हायचा तो होईल, पण तोवर महाराष्ट्राच्या जनतेला तीन पक्षांचा हा तमाशा नाइलाजाने सहन करावा लागणार आहे," असं लेखात म्हटलं आहे.

अजितदादांचे हे मोठेच कौशल्य

"मध्यंतरी भाजप आमदारांनीही गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन अर्थमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध तक्रारी केल्या होत्या. अजित पवारांना आवरा, असे गाऱ्हाणे घेऊन भाजप आमदार अमित शहा यांना भेटले. त्यावर ‘त्यांच्या इतके मागे लागा की, अजित पवारच माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजेत’, असा डबल इंजिन सरकारचा आदर्श कानमंत्र अमित शहांनी आपल्या आमदारांना दिला. महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये हे असे मनोरंजक महानाट्य सुरू आहे. 132 आमदार असलेल्या भाजपला व अमित शहांनी स्थापन केलेल्या मिंधे पक्षालाही अजित पवार जेरीस आणत असतील तर या सरकारमध्ये केवळ अजित पवारच खुश आहेत व अजितदादांचे हे मोठेच कौशल्य आहे, असे म्हणावे लागेल," असा खोचक चिमटा अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

तीन पक्षांचा तमाशा

"सरकार कोणत्याही पक्षाचे असो, पण सरकारमधील नाराजांना मात्र कोणताही पक्ष नसतो. मिंधे मंडळ उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्येही नाराज होते आणि आता फडणवीस सरकारमध्येही त्यांची नाराजी कायम आहे. सत्ता, पदाचा लोभ, पैसा, अहंकार व राजकीय महत्त्वाकांक्षेत नाराजीच्या व्याधीचे मूळ दडलेले असते. नाराजीच्या या आजारावर कुठलेच औषध नाही. एकदा तो जडला की, बळावत जातो. फडणवीस सरकारमध्ये नाराजीनाट्यांचा जो तीन पक्षांचा तमाशा सुरू आहे, त्यावरून भविष्यात मंत्रिमंडळातच टोळीयुद्ध भडकू नये म्हणजे झाले," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.

Read More