Aurangzeb Tomb Controversy: औरंगजेबच्या कबरीवरुन सुरु असलेल्या वादावरुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर निशाणा साधला आहे. 'सामना'च्या अग्रलेखामधून औरंगजेबच्या कबरीच्या मुद्द्यावरुन ठाकरेंच्या सेनेनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही टीका केली आहे. भारतीय जनता पार्टीचे ओडिशातील बारगढ येथील खासदार प्रदीप पुरोहित यांनी पंतप्रधान मोदींची शिवरायांची तुलना केल्यावरुन ठाकरेंच्या शिवसेनेनं कठोर शब्दांमध्ये टीका केल्याचं दिसून येत आहे.
"फडणवीस वगैरे लोकांना शिवरायांपेक्षा औरंग्या अधिक महत्त्वाचा वाटतो हे आता स्पष्ट झाले. शिवरायांचे राज्य धर्माचे, पण सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जाणारे होते. हा विचार भाजपला आधीही मान्य नव्हता आणि आताही मान्य नाही. मुळात छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजीराजे हे संघ किंवा भाजपच्या विचारधारेची प्रतीके कधीच नव्हती. आता ते सोयीनुसार ‘जय शिवाजी’, ‘जय संभाजी’ म्हणत आहेत," असं 'सामना'च्या अग्रलेखामध्ये म्हटलं आहे. भाजपावर टीका करताना, 'औरंग्या तोच भाजपचा नवा ‘शिवाजी’!' या अग्रलेखातून ठाकरेंच्या शिवसेनेनं, "या लोकांना शिवाजीराजे व संभाजीराजांचे महत्त्व कमी करायचे आहे. त्यामुळे शिवाजीराजे व संभाजीराजे ज्या खलनायकाविरुद्ध लढले आणि त्यांनी ज्याला महाराष्ट्रात गाडले, त्या खलनायक औरंगजेबालाच आधी कबरीसह संपवायचे. खलनायक संपला की, ‘नायक’ शिवाजीराजे व संभाजीराजेही आपोआप संपतील ही यांची चाल आहे," असं म्हटलं आहे.
"लोकसभेत भाजपचे ओडिशातील बारगढ येथील खासदार प्रदीप पुरोहित यांनी जाहीरपणे सांगितले, ‘‘आमचे शिवाजी मोदी आहेत. मोदी आधीच्या जन्मात छत्रपती शिवाजी होते.’’ तेव्हा आता भाजपने नव्या शिवाजीला जन्म दिला आहे आणि त्यासाठी मूळ शिवाजी खतम करण्याचे त्यांचे मनसुबे आहेत. पुन्हा शिवाजीराजांना खतम करायचे तर आधी औरंगजेबाची कबर उखडायची. म्हणजे इतिहास आपोआप नष्ट झाला. महाराष्ट्रात नेमके तेच घडताना दिसत आहे. मोदी यांना छत्रपती शिवाजी ठरवून जे महिमामंडन चालले आहे ते भयंकर आहे. छत्रपतींचे वंशज उदयनराजे (श्रीमंत) व शिवेंद्रराजे भोसले (श्रीमंत) यांना मोदी हेच शिवाजीराजे हे महिमामंडन मान्य आहे काय?" असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं केलं आहे.
नक्की वाचा >> 'मोदी, फडणवीस, भागवत, शिंदे, अजित पवार या 5 जणांनी हातात कुदळ-फावडे घेऊन..'; ठाकरेंच्या सेनेचा सल्ला
"छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्रात एकोपा निर्माण केला. आज मात्र महाराष्ट्र दुभंगला आहे व धर्मद्वेषाने पेटला आहे. कुराणाची प्रत कोठे मिळाली तर सन्मानाने परत करा असे छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र सांगते. मात्र नागपुरात कुराणातील आयती जाळण्याचा प्रकार झाला. राजापुरात होळींचे खांब मशिदीत घुसवून दंगल घडविण्याचा प्रयत्न झाला. महाराष्ट्रात पेटवापेटवी सुरू आहे ती औरंगजेबाच्या नावाने. चारशे वर्षांपूर्वी गाडलेला औरंग्या पुन्हा जिवंत केला गेला आहे. कारण भाजपच्या ‘पोटात’ नवा शिवाजी वाढतो आहे. छत्रपती शिवाजी महाराज, आम्हाला माफ करा," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.