Sushma Andhare on Sudhakar Badgujar: नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपाने धक्का दिला आहे. शिवसेनेतून हकालपट्टी झालेले सुधाकर बडगुजर यांनी मंगळवारी भाजपात प्रवेश केला. सकाळी बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत कानावर हात ठेवणारे नेते दुपारी मात्र बडगुजरांसाठी भाजप प्रदेश कार्यालयात पायघड्या घालत होते. दरम्यान सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशामुळं भाजपाची भलतीच अडचण झाली आहे. सहा महिन्यापूर्वी सुधाकर बडगुजर यांना भाजप देशद्रोही म्हणत होते. आता तेच भाजप नेते सुधाकर बडगुजरांना हिंदुत्ववादी वाटू लागले आहेत. दरम्यान विरोधकांनी यावरुन भाजपावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनीही पोस्ट शेअर करत भाजपावर टीका केली आहे.
"सलीम कुत्ताच्या पार्टीतला बडगुजरसारख्या पापी जिवातम्यांचा हैदोस बघून भाचा नितेश राणेचे पित्त खवळले होते. यावर 52कुळी उपाय म्हणून तत्परता दाखवत "सुधाकर"ला सुधारक ठरवण्याचा विडा हाती घेतला. बोले तो भिडू, यही BJP का हिंदुराष्ट्र है. कल को सलीम कुत्ता भी आकर मॅटर क्लोज कर सकता है," असा टोला सुषमा अंधारे यांनी पोस्टमधून लगावला आहे.
सुधाकर बडगुजरांना अटक करण्यासाठी अवघ्या सहा महिन्यापूर्वी भाजप नेते नितेश राणेंनी रान उठवलं होतं. सुधाकर बडगुजर यांचा दाऊदचा हस्तक सलीम कुत्ता याच्यासोबतचा पार्टीचा व्हिडिओ आणि फोटो समोर आला होता. त्यावेळी नितेश राणेंनी नागपूरच्या विधिमंडळात सुधाकर बडगुजरांचे फोटो दाखवून बडगुजरांना अटक करण्याची मागणी केली होती. सुधाकर बडगुजरांच्या हिंदुत्वावरही प्रश्नचिन्हं निर्माण केलं होतं.
सलीम कुत्ताच्या पार्टीतला बडगुजरसारख्या पापी जिवातम्यांचा हैदोस बघून भाचा नितेश राणेचे पित्त खवळले होते.
— SushmaTai Andhare (@andharesushama) June 17, 2025
यावर 52कुळी उपाय म्हणून तत्परता दाखवत "सुधाकर"ला सुधारक ठरवण्याचा विडा हाती घेतला.
बोले तो भिडू, यही BJPका हिंदुराष्ट्र है
कल को सलीम कुत्ता भी आकर मॅटर क्लोज कर सकता है.. pic.twitter.com/hUBiQqFEzI
हिवाळी अधिवेशनात आक्रमकपणे बडगुजरांवर टीका करणा-या नितेश राणेंचा आवेश अर्थसंकल्पीय अधिवेशानात कमी झाल्याचा पाहायला मिळाला. बडगुजरांपेक्षा संजय राऊतांवर कारवाई करा अशी मागणी नितेश राणेंनी केली.
सुधाकर बडगुजर यांचा भाजपप्रवेश काही तासांवर आल्यावर भाजपला वेगळाच साक्षात्कार झाला. काही महिन्यांपूर्वी देशविरोधी, देशद्रोही वाटणारे बडगुजर आता भाजपला हिंदुत्ववादी वाटू लागलेत. 'सुधाकर बडगुजरांचा हिंदुत्वाचा प्रवास फार जोमाने सुरु आहे. त्यांचा स्वत:चा मुलगा आमचे सकल हिंदू मोर्चे निघाले तेव्हा खांद्याला खांदा लावून सहभागी होता. म्हणून हिंदुत्व भक्कम होत असेल, हिंदुत्वासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून काम करत असेल तर कोणाला अडचण नाही", असं नितेश राणे आता म्हणाले आहेत.
पक्षप्रवेश केलेल्या सर्वांचे हार्दिक स्वागत !
— Ravindra Chavan (@RaviDadaChavan) June 17, 2025
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली 'विकसित भारत' घडत आहे, तसेच आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात समृद्ध महाराष्ट्र घडविण्याच्या मार्गावर आपण सर्वजण वाटचाल करत आहोत. हीच बाब राज्यातील विविध पक्षांतील… pic.twitter.com/Gyejdmdgvw
पक्षात दुसरे नेते घेताना भाजपनं कोणतंही धोरण ठरवलेलं दिसत नाही. किंबहुना आधी आरोप करायचे आणि नंतर पक्षात घ्यायचं असं भाजपचं धोरण असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे.
सलीम कुत्ता हा दाऊद इब्राहिमचा साथीदार असून, 1993 च्या मुंबई स्फोटातील मुख्य आरोपी आहे. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला सलीम कुत्ता पॅरोलवर बाहेर होता. त्याचवेळी एका पार्टीत सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजर एकत्र आल होते, असा आरोप नितेश राणेंचा आहे. या पार्टीचे फोटो आणि व्हीडिओ असलेला पेनड्राईव्ह नितेश राणेंनी विधानसभेत दाखवत कारवाईची मागणी केली. त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एसआयटीची घोषणा केली.
त्यानंतर बडगुजर यांनी स्पष्टीकरण दिलं होतं की, “एखाद्या सार्वजनिक ठिकाणी सलीम कुत्तासोबत भेट झाली असल्यास मला माहित नाही. मात्र, सलीम कुत्तासोबत माझे कधीच संबंध नव्हते, आताही नाहीत आणि पुढेही नसतील. तरीही कुठल्याही चौकशीसाठी पोलिसांना सहकार्य करण्यास मी तयार आहे.”