Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'बाळासाहेबांनी केलेल्या संघर्षावर दारूच्या गुळण्या टाकण्याचे...'; उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक

Uddhav Thackeray Shivsena Takes Dig At Eknath Shinde Party: ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेताना भाजपाबरोबर शिंदेच्या पक्षालाही सुनावलं आहे.

'बाळासाहेबांनी केलेल्या संघर्षावर दारूच्या गुळण्या टाकण्याचे...'; उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक

Uddhav Thackeray Shivsena Dig At Eknath Shinde Party: "स्वतःला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार वगैरे मानणारे ‘एसंशिं’ गटाचे लोक भाजपच्या ताटाखालची मांजरे बनली आहेत. महाराष्ट्राला कमजोर करण्याची, मराठी भाषा व मराठी माणसाला अपमानित करण्याची एकही संधी हे भाजपवाले सोडत नाहीत. त्यामुळे भाजपचा आश्रित ‘एसंशिं’ गटदेखील भाजपच्याच मराठीद्वेष्ट्या भूमिकेची ‘री’ ओढत आहे. फडणवीस मंत्रिमंडळातील एक मंत्री व ‘एसंशिं’ गटाचे पुढारी प्रताप सरनाईक यांनी असे जाहीर करून टाकले की, हिंदी आता मुंबईची बोलीभाषा बनली आहे. सरनाईक पुढे म्हणतात, ‘‘हिंदी आता आमची लाडकी बहीण झाली आहे. या लाडक्या बहिणीच्या कृपेनेच आम्ही 237 जागांवर निवडून आलो.’’ अशा तऱ्हेने ‘एसंशिं’ गटाने महाराष्ट्राची ‘राजभाषा’ बदलून त्या जागी हिंदीची प्रतिष्ठापना केल्याचे स्पष्ट दिसते" असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे.

बुलडोझरखाली आमची मराठी

"मराठी भाषेचा, महाराष्ट्राचा असा अपमान केल्याबद्दल संबंधित मंत्र्यांना बरखास्तच करायला हवे. मुंबईची भाषा मराठी नाही हे ऐकण्यासाठीच काय संयुक्त महाराष्ट्र लढ्यात 107 हुतात्म्यांनी बलिदान केले होते? पण मुंबईसह महाराष्ट्रावर सध्या व्यापारी व बिल्डरांचे राज्य आले आहे आणि त्यांच्या बुलडोझरखाली आमची मराठी भाषा चिरडून आक्रोश करत आहे," असं 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे. "काही दिवसांपूर्वी संघ-भाजपचे एक नेते भैयाजी जोशी यांनी घाटकोपर येथे जाऊन घाटकोपरची भाषा गुजराती असल्याचे परस्पर जाहीर करून टाकले होते. त्यावर मुंबईत गोंधळ झाल्यावर जोशी यांनी निदान खुलासा तरी केला. सरनाईक व त्यांच्या नेत्यांनी तेवढे सौजन्यही दाखवले नाही," असा टोला ठाकरेंच्या सेनेनं लगावला आहे.

मराठी भाषेचा अपमान करण्याचा परवाना मिळाला आहे काय?

‘‘मीरा-भाईंदर वगैरे भागात आल्यावर माझ्या तोंडून आपोआप हिंदी बाहेर पडते. कारण या भागाची भाषा हिंदी आहे व तुम्ही सगळे मला मतदान करता,’’ असे मराठी राज्याचे मंत्री सांगतात. हे मराठी राजभाषा धोरणात बसते काय? महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे व आता महाराष्ट्रातील केंद्रीय आस्थापना वगैरेतही मराठी सक्तीची केली आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्यांना मराठी शिकावे लागेल हे फक्त महाराष्ट्रापुरते धोरण नाही. बंगालमध्ये राहणाऱ्यांना बंगाली, गुजरातमध्ये राहणाऱ्यांना गुजराती, उत्तरेत राहणाऱ्यांना हिंदी भाषेचे ज्ञान प्राप्त करून त्या त्या राज्यात त्या भाषेत व्यवहार करावेच लागतील. आपल्या मातृभाषेचा किंवा राजभाषेचा अभिमान बाळगणे म्हणजे आम्ही इतर भाषा भगिनींचा द्वेष करतो असे नाही. प्रताप सरनाईक यांनी हिंदी भाषेवर प्रेमाचा वर्षाव करताच त्यांच्या मदतीस भाजप अध्यक्ष बावनकुळे धावून आले. ‘‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आम्ही दिलाय हे विसरू नका,’’ असे ते म्हणाले. हा दर्जा दिला म्हणून तुमच्या मंत्र्यांना मराठी भाषेचा असा अपमान करण्याचा परवाना मिळाला आहे काय?" असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारला आहे.

नऊ कोटी लोक मराठी बोलतात

"मराठीच्या छाताडावर उपऱ्यांना बसविण्याची सूट मिळाली आहे काय? याचे आधी उत्तर द्या. महाराष्ट्राची लोकसंख्या साडेअकरा कोटी आहे व त्यातील साधारण नऊ कोटी लोक मराठी बोलतात. मराठीत व्यवहार करतात. मराठी ही महाराष्ट्र राज्याची एकमेव अधिकृत भाषा आहे व येथे राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी यायलाच हवी असा कायदा असल्याचे ‘एसंशिं’ गटाच्या मंत्र्यांना माहीत नाही काय?" असा सवाल अग्रलेखात करण्यात आला आहे. "आम्ही मराठी भाषेच्या अभिमानाचा गौरव करताना सांगतो,

माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या, दऱ्याखोऱ्यांतील शिळा
हिच्या गगनात घुमे, आद्य स्वातंत्र्याची ग्वाही
हिच्या पुत्रांच्या बाहूंत आहे, समतेची ग्वाही
माझ्या मराठी मातीला, नका म्हणू हीनदीन
स्वर्गलोकाहून थोर, मला हिचे महिमान

आमच्या मराठी भाषेचे हे वैभव आहे. मराठी भाषा ही छत्रपती शिवरायांची, वीर सावरकरांची, लोकमान्य टिळकांची आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भाषा आहे," असंही लेखात म्हटलंय.

दारूच्या गुळण्या...

"मुंबईतील मराठी माणसाला ताठ मानेने जगता यावे, मराठी भाषेचा सन्मान राहावा यासाठीच शिवसेनेची स्थापना झाली. मराठीचे अनेक लढे शिवसेना पन्नास वर्षे लढत आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची, मुंबईतील कष्टकऱ्यांची, गिरणी कामगारांची मराठी भाषा तेजाने तळपत राहावी म्हणून श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या संघर्षावर दारूच्या गुळण्या टाकण्याचे काम ‘एसंशिं’ गटाने चालवले आहे," असं घाणाघात ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे.

मुंबईची भाषा मराठी नाही असे सांगणे

"मराठीचा अभिमान भ्रष्टाचार आणि ठेकेदारांच्या पैशांनी विकत घेता येत नाही हे कोणीतरी भाजपच्या या सर्व आश्रितांना सांगायला हवे. महाराष्ट्राच्या कणाकणाची भाषा मराठीच आहे. घाटकोपर आणि मीरा-भाईंदरचा तुकडा पाडून तो महाराष्ट्राबाहेर टाकलेला नाही व खासगी बिल्डरांनी त्यांचे स्वतंत्र स्वायत्त संस्थान केलेले नाही. महाराष्ट्र अखंड आहे व राहील. अमित शहांनी कितीही स्वाऱ्या केल्या व ‘एसंशिं’वाल्यांनी मुंबई ही अदानी तसेच बिल्डरांच्या घशात घालण्याचा कितीही प्रयत्न केला तरी मराठी मातीतला कण आणि कण ज्वालामुखीसारखा उसळून बाहेर येईल. भाजपच्या ईस्ट इंडिया कंपनीने (सुरत) मुंबई विकायला काढलीच आहे. स्वतःला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार वगैरे म्हणवून घेणारे ढोंगी या ईस्ट इंडिया कंपनीचे भागीदार बनल्यावर मुंबईतून मराठी माणसाला हद्दपार करणारच. मुंबईची भाषा मराठी नाही असे सांगणे ही त्याची सुरुवात आहे. मराठी माणसाला लढावेच लागेल," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.

Read More