Uddhav Thackeray Party Warns CM Devendra Fadnavis: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधीपक्षाच्या बाकावरील माजी उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सत्ताधाऱ्यांच्या बाकांवर येण्याची संधी अशी म्हणत सूचक ऑफर दिली होती. या ऑफरची चांगलीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. खरं तर मागील काही काळात या दोन्ही नेत्यांच्या अनेकदा भेटीगाठी झाल्या आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये पडद्यामागे काही घडतंय का याबद्दल चर्चांना उधाण आलेलं असतानाच आज उद्धव ठाकरेंच्या पक्षाने मुख्यमंत्री फडणवीस यांना त्यांच्याच जवळच्या एका माणसापासून सावध राहण्याचा सूचक इशारा दिला आहे. सध्या राज्यात गाजत असलेल्या पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर हा इशारा ठाकरेंच्या पक्षाने दिला आहे.
"पुण्यातील खराडीतल्या एका हॉटेलमधील खोलीत डॉ. खेवलकर व त्यांची मित्रमंडळी जमून पार्टी करीत होते व पोलिसांना त्याबाबत खबर मिळताच पोलीस आत घुसले. या पार्टीत नशेचे पदार्थ, दारू, हुक्का वगैरे सापडले असून डॉ. खेवलकर यांना अटक केली असे एकंदरीत कथानक आहे," असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेनं एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांना झालेल्या अटकेवर भाष्य केलं आहे. खेवलकर यांचा अटक करण्यात आलेल्यांमध्ये समावेश असल्याने या धाडसत्रास राजकीय महत्त्व प्राप्त झाल्याचा उल्लेखही 'सामना'च्या अग्रलेखात आहे. विशेष म्हणजे रेव्ह पार्टीचं हे सारं प्रकरण एकनाथ खडसे सातत्याने उपस्थित करत असलेलं एक प्रकरण दाबण्यासाठी करण्यात आल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
"खडसे यांच्या जावयास अशा पद्धतीने अटक झाल्याने मंत्री गिरीश महाजन यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहताना दिसला. एव्हरेस्ट शिखर सर करून त्याच्या टोकावर भाजपचा झेंडा लावल्याची खुशी त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. यास एक प्रकारची विकृतीच म्हणायला हवी. खडसे हे गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील हनी ट्रॅपवर जोरात बोलत होते. त्यांचा हल्ला थेट महाजन यांच्यावर होता. हनी ट्रॅपचे सूत्रधार महाजन आहेत व त्यांच्या ‘हनी’ प्रकरणाची सीडी ज्यांच्याकडे आहे तो भाजपचा कार्यकर्ता व महाजनांचा दोस्त प्रफुल्ल लोढा सध्या अटकेत आहे. ‘लोढा-महाजन यांच्यातील नाजूक व्यवहाराची चौकशी करा, अनेक धक्कादायक बाबी बाहेर येतील, असे खडसे सांगत असतानाच फडणवीस यांच्या शूर पोलिसांनी वेगळाच ट्रप लावला व खडसे यांच्या जावयांना पकडले. हनी ट्रॅपसारख्या गंभीर प्रकरणावरील लक्ष उडविण्यासाठी व खडसे यांना धडा शिकविण्यासाठीच हे नवे प्रकरण घडवले काय? अशी शंका घेण्यास त्यामुळे जागा आहे," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
याच पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेनं कठोर शब्दांमध्ये गिरीश महाजनांना लक्ष्य करताना फडणवीसांना त्यांच्यासंदर्भात सूचक इशारा दिलाय. "महाजन यांनी उत्तर महाराष्ट्रातील सर्व गुंड, भ्रष्टाचारी, बलात्कारी लोकांना भाजपमध्ये सामील करून घेतले. आता भाजप ‘हाऊसफुल्ल’ झाल्याचे त्यांनी जाहीर केले. भाजपची ही अशी दयनीय अवस्था झाली. सर्व गुंडांना, दलालांना घेऊन त्यांना भाजप चालवावा लागतोय. पुन्हा हे लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जाऊन नैतिकतेवर प्रवचने देतात. खडसे, भाऊसाहेब फुंडकर, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी अशा लोकांनी महाराष्ट्रात भाजप वाढवला. त्यांनी इतरांचे पक्ष न फोडता, गुंड, बलात्काऱ्यांसाठी लाल गालिचे न अंथरता पक्ष वाढवला; पण महाजन, फडणवीस, रवींद्र चव्हाण वगैरे लोकांना नैतिकतेचे वावडे आहे व पक्ष ‘हाऊसफुल्ल’ करण्यासाठी ते कोणत्याही थराला जात आहेत," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलंय.
"गिरीश महाजन यांच्या कारनाम्यांविषयी काय फडणवीस यांना माहीत नाही? पोलिसांचा मस्तवाल वापर करून त्यांचे राजकारण सुरू आहे. हाताशी पोलीस आहेत म्हणून महाजनसारख्यांचे राजकारण टिकले आहे.गिरीश महाजन हा एक पाताळयंत्री व राक्षसी महत्त्वाकांक्षेचा माणूस आहे. महाजन यांच्या सर्व करामती अमित शहांना माहीत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात महाजन यांना घेऊ नये, असे शहांचे म्हणणे होते. पण हे असले उद्योग करण्यासाठी फडणवीस यांना महाजनांसारखे लोक लागतात. त्यामुळे फडणवीस यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतले, पण त्यांना कोणतेही महत्त्वाचे खाते दिले नाही," असा घणाघात ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे.
"सत्तेचे, पैशांचे, अनैतिकतेचे बेफाम वारे गिरीश महाजनांच्या डोक्यात शिरले आहे," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आङे. तसेच, "ज्या प्रकारचे गुंड, भ्रष्ट, अनैतिक लोक भाजपमध्ये घेतले जात आहेत ते पाहता भाजप हीच एक रेव्ह पार्टी बनली आहे व या रेव्ह पार्टीचे सूत्रधार गिरीश महाजन आहेत. देवेंद्र फडणवीस यांना हा माणूस गोत्यात आणू शकतो," असा सूचक इशाराही लेखाच्या शेवटी ठाकरेंच्या सेनेनं मुख्यमंत्री फडणवीसांना दिला आहे.