Ujjwal Nikam: विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, यांना 13 जुलै 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कायदा क्षेत्रातील योगदानासाठी राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्त केले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ते मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढले होते पण काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याकडून 16 हजार 541 मतांनी पराभूत झाले. सध्या ते बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून कार्यरत असून या खटल्यात त्यांनी महत्त्वपूर्ण युक्तिवाद केले आहेत. नुकताच त्यांनी अभिनेता संजय दत्त याच्याबद्दल खळबळजनक खुलासा केलाय.
मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात विशेष सरकारी वकील असलेले उज्ज्वल निकम यांनी मोठा दावा केला आहे. जर अभिनेता संजय दत्तने पोलिसांना AK-47 ने भरलेल्या व्हॅनबद्दल माहिती दिली असती तर 1993 चे मुंबई बॉम्बस्फोट रोखता आले असते. या हल्ल्यात 267 जणांना आपला जीव गमवावा लागला. हा देशातील सर्वात मोठ्या दहशतवादी घटनांपैकी एक म्हणून ओळखला जातो.
उज्ज्वल निकम आता राष्ट्रपतींच्या शिफारशीवरून राज्यसभेत जात आहेत त्यांनी NDTV ला दिलेल्या मुलाखतीत यावर भाष्य केले. संजय दत्तने शस्त्र बाळगण्याचा गुन्हा केला होता. पण त्याने कधीही AK-47 वापरले नाही. त्याचा हेतू दहशत पसरवणे नव्हता तर त्याला फक्त शस्त्रांचे आकर्षण होते. त्याने कायद्याच्या दृष्टीने गुन्हा केला पण तो एक साधा माणूस आहे. मी त्याला निर्दोष मानत होतो, असेही उज्वल निकम पुढे म्हणाले.
स्फोटाच्या काही दिवस आधी अबू सालेम संजय दत्तच्या घरी एक व्हॅन घेऊन आला होता. ज्यामध्ये ग्रेनेड आणि AK-47 सारखी शस्त्रे होती. संजय दत्त काही शस्त्रे घेऊन गेला नंतर परतला आणि त्याने स्वतःकडे फक्त एक AK-47 ठेवली. जर त्याने पोलिसांना याबद्दल माहिती दिली असती तर तपास सुरू झाला असता आणि कदाचित 12 मार्च 1993 चे स्फोट टाळता आले असते, असे उज्वल निकम म्हणाले.
1993 च्या प्रकरणात न्यायालयाने संजय दत्तला दहशतवादविरोधी कायद्यातून मुक्त केले पण शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत त्याला दोषी ठरवले. नंतर सर्वोच्च न्यायालयाने त्याची 6 वर्षांची शिक्षा कमी करून पाच वर्षे केली. त्याने पुण्याच्या येरवडा तुरुंगात ही शिक्षा पूर्ण केली.
उज्ज्वल निकम यांनी पहिल्यांदाच न्यायालयात संजय दत्तसोबत झालेल्या संभाषणाचा खुलासा केला. शिक्षा सुनावल्यानंतर संजय दत्तचे वर्तन बदलले होते आणि त्याला धक्का बसला होता. पण मी त्याला समजावून सांगितले की, 'संजय, असे करू नको. मीडिया पाहत आहे. तू एक अभिनेता आहेस. जर तू घाबरलेला दिसलास तर लोक तुला दोषी मानतील. तुझ्याकडे अपील करण्याचा पर्याय आहे'. यावर संजयने, 'हो सर, हो सर' असे उत्तर दिले.
निकम यांनी 26/11 हल्ल्यातील दोषी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबविरुद्ध एक मोठा खटला देखील लढवला होता. त्यावेळी बिर्याणीवरील त्यांच्या विधानाने बरीच चर्चा रंगली होती. आता निकम म्हणाले की, 'कसाबने खरोखरच बिर्याणीची मागणी केली होती. पण नंतर या मुद्द्याला राजकीय रंग देण्यात आला'. देशातील महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये बराच काळ वकील असलेले उज्ज्वल निकम आता राजकारणात प्रवेश करत आहेत. राष्ट्रपतींच्या शिफारशीवरून त्यांना राज्यसभेत नामांकन देण्यात आले आहे.