Ulhasnagar Crime: गंभीर गुन्हे करुनही करुनही त्यांची विजयी मिरवणूक निघते. फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचं जंगी स्वागत होतं. जेलमधून सुटूनही जर गुडांचा उन्माद असाच सुरु असेल तर याला कायद्याचं राज्य म्हणायचं का? असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण उल्हासनगरच्या घटना याला कारणीभूत ठरल्यायत.
जामिनावर सुटलेले अट्टल गुन्हेगार सेलिब्रेशन करतानाचा व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल होतोय. कल्याणच्या आधारवाडी जेलमधून गुंडांची जामिनावर सुटका झाली आणि त्यांच्या पंटर लोकांनी शहरातून चक्क त्यांची जंगी मिरवणूकच काढली.
यातील एका आरोपीवर तरुणींच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे.. या आरोपीचं नाव आहे रोहित झा. उल्हासनगर कॅम्प 2 मधील रमाबाई टेकडी परिसरात 27 एप्रिल रोजी बिपिन झा, रोहित झा, सोनमणी झा, आणि बिट्टू यादव यांनी एका घरात घुसून दोन तरुणींचा विनयभंग केला. त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींना अटक झाली. मात्र कोर्टानं रोहित झा याचा जामीन मंजूर केला आणि 17 जुलैला आधारवाडी जेलमधून त्यांची सुटका झाली.
जेलमधून सुटताच त्याच्या टोळीतील गुंडांनी जेलपासून उल्हासनगरपर्यंत त्याची मिरवणूक काढली. हे गुंड इथंच थांबले नाहीत तर ज्या तरुणींचा त्यांनी विनयभंग केला होता तिच्या घरासमोर फटाके फोडत आणि ढोलताशाच्या गजरात विकृत सेलिब्रेशन केलं.. याचा व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल केले. दहशत पसरवण्यासाठी हे सारं काही केलं गेलं.
उल्हासनगर कॅम्प 2मधील गुंडांनी 27 एप्रिल 2025 रोजी रमाबाई नगरमध्ये त्यानं दारुच्या नशेत एकावर तलवार आणि लोखंडी रॉडनं मारहाण केली. त्याला अटक करुन तरुंगात डांबलं. मात्र 16 जुलैला तोही जामिनावर सुटला आणि त्याच्या पंटर लोकांनी त्याचंही असं जंगी स्वागत केलं. या गुंडांचा हा उन्माद राजरोसपणे शहरात सुरु आहे. त्यामुळे सामान्य नागरिक या गुंडांच्या दहशतीत आहेत.. घराबाहेर गेलेली तरुण मुलगी सुखरुप घरी परतेल का याची चिंता इथल्या नागरिकांना वाटते..
आता हा सगळा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी यातील रोहित झा याच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. रोहित झा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र तुरुंगातून सुटल्यानंतरही या गुंडांमध्ये एवढी हिंमत येते कुठून. गुन्हा केल्याची जराही लाज न बाळगता या गुंडांचा हा उन्माद हेच दाखवतोय की त्यांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक उरलाच नाहीये.