UPSC Success Story: तुमचा आजचा संघर्ष हा उद्याच्या यशाची पाऊलखूण असते. शहरापासून दूर गावाखेड्यातून आलेल्या तरुणांसाठी हा संघर्ष खूप मोठा असतो. प्रामाणिकपणे केलेला संघर्ष, प्रयत्नांमध्ये ठेवलंल सातत्य कधीच वाया जात नाही. बिरदेव सिद्दाप्पा डोणे यांनी हे सिद्ध करुन दाखवलंय. यूपीएससीचा निकाल लागला, त्यात बिरदेव उत्तीर्ण झाला. बिरदेवला निकाल कळला तेव्हा तो मेंढी चारायला गेला होता. कोल्हापूरचा धनगर तरुण आयपीएस झाल्याने सर्वांनाच आनंद झालाय.
कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील यमगे गावात सध्या आनंदाचं वाचावरण आहे. कारण इथला बिरदेव सिद्दाप्पा डोणे याने भारतीय लोकसेवा आयोगाच्या 2025 च्या परीक्षेत देशात 551 क्रमांक घेऊन उत्तीर्ण झालाय. आतापर्यंत आपण संघर्षाच्या अनेक कहाण्या ऐकल्या असतील. संघर्ष हा बिरदेव यांच्या पाचवीला पुजलेला आहे. बिरदेव आणि त्याचा परिवार मेंढपाळीचा व्यवसाय करुन गुजराणा करतात. विविध गावात भटकंती करणाऱ्या, मेंढराना चारवणाऱ्या प्रतिकूल परिस्थितून येऊन आयपीएस होणे हे संघर्ष करणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.
बिरदेव यांनी युपीएससी परीक्षेत 551 वा क्रमांक मिळवत आयपीएस बनण्याचा प्रवास पूर्ण केला. बिरदेव यांच्यासाठी हा प्रवास अजिबात सोपा नव्हता.त्यांनी याआधी दोनदा परीक्षा दिली होती. पण यात त्याला यश मिळालं नव्हतं. अखेर तिसऱ्या प्रयत्नात त्याच्या कष्टाचं चीज झालं. वडिलांनी फेटा बांधून बिरदेवचं अभिनंदन केलं.
आयुष्यात काहीतरी मोठं करायचं, गावकऱ्यांना अभिमान वाटेल असं काहीतरी करायचं असं मेंढपाळ असलेल्या बिरदेवने ठरवलं होतं. मग आयपीएस बनणं हे स्पप्न त्याने आखलं. यासाठी यूपीएससी द्यायला सुरुवात केली. घरी अभ्यासाचं वातावरण नव्हतं. त्यामुळे गावातील मराठी शाळेचा व्हरांड्यामध्ये त्याने अभ्यास करायला सुरुवात केली.
दहावीत उत्तीर्ण झाल्यावर अनेक विद्यार्थी आपण भविष्यात डॉक्टर होणार, इंजिनीअर होणार, असे स्वप्न सांगतात. पण यातील खूप कमीजण आपल्या स्वप्नापर्यंत पोहोचतात. बिरदेवला दहावीच्या परीक्षेत 96 टक्के मिळाले होते. मुरगूड केंद्रात पहिला आलयाने त्यावेळी गावकऱ्यांनी बिरदेवचा सत्कार केला होता. यावेळी त्याने आपण आयपीएस होणार असे सांगितले होते. त्यावेळी बिरदेवच्या स्वप्नावर कदाचित कोणी विश्वास ठेवला असेल. पण बिरदेव आपल्या स्वप्नांशी प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहिला. बारावी विज्ञान शाखेत त्याने 89 टक्के गुण मिळवले. पुढे पुणे सीओइपी येथे स्थापत्य विभागात त्याने आपले उच्च शिक्षण पूर्ण केले.
उच्च शिक्षणानंतर बिरदेव यूपीएससी तयारीसाठी पुणे येथे आला. तिथे सदाशिव पेठेमध्ये त्याने अभ्यास सुरु केला. सलग 2 परीक्षांमध्ये त्याला अपयश आले. पण त्याने हार मानली नाही. गेल्यावर्षी त्याने तिसरा अटेम्प्ट दिला. यानंतर देशात 551 वा रँक मिळवत उत्तूंग यश मिळवले. बिरदेव हा कागल तालुक्यातील पहिला आयपीएस अधिकारी ठरलाय.