UPSC Success Story: आजच्या काळात इंग्रजी ही एक स्टेटस सिम्बॉल बनली आहे. ज्याला इंग्रजी बोलता येते तो सुशिक्षित आणि ज्ञानी मानला जातो. ज्याला इंग्रजी माहिती नाही त्याला तुच्छ मानले जाते. कॉलेजमध्ये असे प्रकार अनेकदा घडतात. इंग्रजी बोलता येत नसल्यामुळे लोक विनोदाचा विषय बनतात. तोडकंमोडकं इंग्रजी येत असलेल्यांची खिल्ली उडवली जाते. सुरभी गौतम यांचीदेखील अशीच खिल्ली उडवली जायची. पण आयएएस बनून सुरभी यांनी साऱ्यांनाच आरसा दाखवलाय.
एक काळ असा होता जेव्हा इंग्रजी नीट बोलता येत नसल्याने कॉलेजमध्ये त्यांची खिल्ली उडवली जायची. पण सुरभी यांनी देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेली यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण केली. त्या आयएएस बनल्या. इंग्रजी बोलता न येणे हे यशाच्या मार्गात अडथळा नाही हे सुरभी यांनी सर्वांना दाखवून दिलंय.
सुरभी गौतम या मध्य प्रदेशातील एका छोट्याशा गावातील रहिवासी आहेत. त्या लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होत्या. त्यांनी दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांची तयारी करतना कोणत्याही कोचिंग किंवा ट्यूशनचे सहाय्य घेतले नाही. शालेय अभ्यास आणि सेल्फ स्टडीवर त्यांचा विश्वास होता. या विश्वासाला मेहनतीची जोड देऊन त्यांनी दोन्ही बोर्ड परीक्षांमध्ये 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवले होते. सुरभी यांना त्यांच्या घरी अभ्यासाचे वातावरण मिळत गेले. त्यांचे वडील वकील आणि आई शिक्षिका होती.
बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर सुरभी यांनी इंजिनीअरिंग करण्याचा निर्णय घेतला. राज्य अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा दिली. या परीक्षेत त्यांनी उत्तम गुण मिळवले. त्यानंतर त्यांनी भोपाळ इंजिनीअरिंग महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकीमध्ये बी.टेक पदवी मिळवली. सुरभीने या परीक्षेत टॉप केले. या कामगिरीबद्दल त्यांना सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले.
असं सर्व सुरु असताना कॉलेजमध्ये त्यांना वेगळीच समस्या भेडसावत होती. इंग्रजी ही सुरभी यांच्यासमोरची मोठी समस्या होती. कारण त्यांनी हिंदी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतल्याने त्यांना इंग्रजीचे फारसे ज्ञान नव्हते. कॉलेजमध्ये त्यांची अनेकदा खिल्ली उडवण्याचे हेच कारण होते.
मग सुरभीने इंग्रजी शिकण्याचा आग्रह धरला. त्यांनी ग्रंथालयातून इंग्रजी इंजिनीअरिंगची पुस्तके घेतली आणि त्यावर काम करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी इंग्रजीमध्ये सेमिस्टरची परीक्षा दिली आणि संपूर्ण विद्यापीठात अव्वल स्थान पटकावले. कॉलेजमधून पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी अनेक स्पर्धा परीक्षा दिल्या आणि उत्तीर्णही केल्या. त्यांनी इस्रोपासून बीएआरसी, आयईएस आणि आयएएस पर्यंतच्या परीक्षांमध्ये यश मिळवले. 2016 मध्ये त्यांनी यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत ऑल इंडिया 50 वा क्रमांक मिळवला आणि आयएएस अधिकारी बनल्या.