Uttan-Virar Sea Link Project: 52 हजार 652 कोटी रुपयांचा उत्तन विरार सागरी मार्गाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. या प्रकल्पाचा आता विस्तार होणार असून वाढवण बंदर व समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे. तसे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. उत्तन-विरार सागरी मार्गाचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA)ने तयार केलेला सुधारित आराखडा मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला होता. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी या सूचना केल्या आहेत.
उत्तन-विरार सागरी मार्ग हा प्रकल्पाच्या विरार कनेक्टरमार्फत वडोदरा-मुंबई एक्स्प्रेसवेशी थेट जोडला जाणार आहे.त्यामुळे उत्तर उपनगरांपासून पश्चिम किनारपट्टीपर्यंतचा मालवाहतूक व प्रवासी वाहतूक मार्ग अधिक जलद व कार्यक्षम होणार आहे. हा प्रकल्प केवळ आर्थिक संधीच निर्माण करणार नाही, तर भारताच्या बंदर आधारित विकास दृष्टिकोनाला महत्त्वाची साथ देणारा ठरणार आहे, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी विशेष उद्देश वहन (एसपीव्ही) तयार करावे. प्रस्तावित मार्गाला आवश्यक मंजुरीची प्रक्रिया वेगाने करावी, असे आदेश फडणवीस यांनी यावेळी दिले.
प्रकल्पाची एकूण लांबी- 55.12 किमी
मुख्य सागरी मार्ग- 24.35 किमी
कनेक्टर- 30.77 किमी
वर्सोवा ते उत्तन हा भाग महापालिकेच्या उत्तन सागरी किनारा मार्ग प्रकल्पातील भाग असल्यामुळं तो सध्याच्या संरेखनातून वगळ्यात आला आहे. त्यामुळं उत्तन - विरार सागरी सेतू प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची उभारणी एमएमआरडीए मार्फत करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळं मुंबईतून - विरारला फक्त 45 मिनिटांत शक्य होणार आहे. या महामार्गामुळं पश्चिम द्रुतगती महामार्ग, एस.व्ही. रोड आणि लिंक रोडसारख्या मार्गावरील ताण हलका होणार आहे. तसंच, वाहतूक कोंडीदेखील कमी होणार आहे. वाहतूक कोंडी कमी झाल्याने वायू व ध्वनी प्रदूषणदेखील कमी होणार आहे.