Uttarakhand Cloudburst : उत्तराखंडमध्ये निसर्ग कोपला आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. चारधाम यात्रेच्या दरम्यानच हे एक मोठं संकट ओढावल. ही अशी वेळ जेव्हा यात्रेव्यतिरिक्तसुद्धा या राज्यात पर्यटनासाठी येणाऱ्यांचा आकडा मोठा असतो. मंगळवार (5 ऑगस्ट 2025)रोजी मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. कारण उत्तराखंडच्य धराली इथं ढगफुटीनंतर नदी- नाल्यांनी रौद्र रूप धारण केलं आणि डोंकरकड्यांवरून पाण्याचे लोट वाटेत येईल ते उध्वस्त करत मैदानी भागांमध्ये आले.
प्रचंड चिखल आणि राडारोडा गावांमध्ये शिरला, घरंच्या घरं, हॉटेलं या ढिगाऱ्याखाली आहे. प्राथमिक माहितीत या आपत्तीमध्ये चौघांच्या मृत्यूची नोंद झाली असली तरीही अद्यापही इथं शेकडो जण बेपत्ता असल्याची भीतीदायक बातमी समोर आली आहे. हे संकट महाराष्ट्रापर्यंत चिंता वाढवताना दिसत आहे.
बुधवारी समोर आलेल्या माहितीनुसार नांदेडमधील 10 पर्यटक उत्तराखंडमधील या संकटाच्या कचाट्यातून कसेबसे वाचले. हे सकारात्मक वृत्त अनेकांना दिलासा देत असतानाच दुसऱ्या वृत्तानं मात्र अनेकांच्या काळजात धस्स केलं आहे. कारण, उत्तराखंडमध्येच गेलेल्या पुण्याच्या जवळपास 24 पर्यटकांशी अद्यापही कोणत्याच प्रकारचा संपर्क होऊ शकलेला नाही. खुद्द खासदार सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भातील माहिती समोर आणली.
X पोस्टच्या माध्यमातून सुळे यांनी पुण्याच्या मंचर इथून 24 पर्यटक नुकत्याच झालेल्या ढगफुटीमध्ये उत्तराखंडमध्येच अडकले असून, मागील 24 तासांपासून त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क होऊ शकलेला नाही असं स्पष्ट केलं. सदर पर्यटकांच्या कुटुंबांच्या चिंतेत यामुळं भर पडली असून, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि स्थानिक प्रशासनाकडे सुप्रिया सुळे यांनी मदतीसाठी आवाहन केलं आहे.
Around 24 citizens from Manchar, Pune, Maharashtra are stranded in Uttarakhand due to the recent cloudburst. Their families are extremely distressed as there has been no contact with them for the past 24 hours.
Requesting Hon. @pushkardhami ji and @ukcmo to kindly intervene and…
— Supriya Sule (@supriya_sule) August 6, 2025
प्राथमिक माहितीनुसार आंबेगाव येथील अवसरी खुर्दच्या 1990 वर्षाच्या 10 वी बॅचचे 8 पुरुष आणि 11 महिला असा मित्रमंडळींचा एक गट उत्तराखंड सफरीवर गेला होता. त्यांच्याशी शेवटचा संपर्क झाला तेव्हा ते गंगोत्री क्षेत्रात होते, जेथील फोटो त्यांनी सोशल मडिया स्टेटसमध्येसुद्धा ठेवले होते. मात्र त्याच दुपारच्या सुमाराय या ढगफुटीचं वृत्त समोर आलं आणि या मंडळींच्या कुटुंबीयांना धडकी भरली.
दुर्घटनेनं प्रभावित क्षेत्रात असलो तरीही आपण सुखरुप असल्याची माहिती या गटातील एका महिलेनं तिच्या मुलाला जिली होती. मात्र त्यानंतर त्यांच्यापैकी कोणाचाही संपर्क होऊ न शकल्यानं आता कुटुंबीयांच्या चिंतेत भर पडताना दिसत आहे.
उत्तराखंडमध्ये सध्या चारधाम यात्रेनिमित्त परराज्यातील पर्यटक मोठ्या संख्येत हजर असून या ढगफुटीनंतर केरळचे 28 पर्यटक बेपत्ता झाले असल्याची माहिती समोर आली. आपत्तीच्याच दिनी सकाळी साडेआठच्या सुमारास ते उत्तरकाशीहून गंगोत्रीला जात होते. जिथं भूस्खलन झालं होतं, या पर्यटकांशीसुद्धा संपर्क होऊ शकलेला नाही, असं त्यांच्या एका नातेवाइकानं सांगितलं आहे.
दरम्यान उत्तराखंडमधील या संकटानंतर प्रभावित क्षेत्रामध्ये मोठ्या परिसराचं नुकसान झालं असून तिथं चिखल आणि राडारोड्याचं साम्राज्य दिसून येत आहे. त्यातच पावसाची हजेरी असल्याच कारणानं बचावकार्यातही अडथळा येत आहे. अद्यापही बेपत्ता असणाऱ्यांचा आकडा मोठा असल्यानं या भागात शोधकार्याला वेग देण्याचं काम प्रशासन करताना दिसत आहे.