Vaibhavi deshmukh NEET Result: बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या हत्येतील प्रमुख आरोपी वाल्मिक कराडसह इतर आरोपींवर न्यायालयात खटला सुरु आहे. वडिलांच्या हत्येनंतर घरावर दु:खाचा डोंगर कोसळला असतानाही लेक वैभवी देशमुखने बारावीची परीक्षा दिली आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. आता वैभवीची नीटचा निकाल समोर आलाय.
वडीलांची हत्या झाली त्याच काळात बारावीची परीक्षा होती. घरावर दु:खाचा डोंगर कोसळला असताना संतोष देशमुखांची लेक वैभवीने परीक्षा दिली होती. वैभवीला बारावी परीक्षेत तब्बल 85.33 टक्के इतके गुण मिळाले होते त्यामुळे संपूर्ण राज्यभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता. निकाल असल्याने वैभवी वडिलांच्या आठवणीने भावुक झालेली दिसली. माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारायला आज माझे वडील नाही, याचं दु:ख होतं, अशी प्रतिक्रिया वैभवीने दिली. माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने माझा निकाल चांगलाच लागल्याची भावनादेखील यावेळी तीने व्यक्त केली होती. दरम्यान नुकताच तिचा NEET चा निकाल समोर आलाय.
वैभवी देशमुखला नीट परिक्षेत 147 गुण मिळवले आहेत. कठीण परिस्थितीत हे यश मिळवल्याने पुन्हा राज्यभरातून तिचं कौतुक होतंय. नीट परीक्षेच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तिचं कौतुक केलंय. सुप्रिया सुळेंनी वैभवीला फोन फोन करुन तिचं अभिनंदन केलं. तसेच त्यांनी वैभवीचे कौतुक करणारी पोस्ट टाकत सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिचे अभिनंदन केले.
मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची कन्या वैभवी हीने #NEET परीक्षा उत्तीर्ण केली. तिचे हे यश सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तिने ही परिक्षा देऊन उत्तम यश संपादन केले. या यशाबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा pic.twitter.com/y7DY91w5Zi
— Supriya Sule (@supriya_sule) June 14, 2025
मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची कन्या वैभवी हीने #NEET परीक्षा उत्तीर्ण केली. तिचे हे यश सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तिने ही परिक्षा देऊन उत्तम यश संपादन केले. या यशाबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील वैभवी देशमुखचं कौतुक केलंय. बारावी परीक्षेनंतर वैभवी संतोष देशमुख हिने मेडिकलसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या NEET सारख्या कठीण परीक्षेत मिळवलेलं घवघवीत यश केवळ शैक्षणिक कामगिरी नाही, तर संकटांशी दोन हात करत ध्येयाला भिडण्याची शिकवण आहे. जी नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल. वैभवी, तुझं यश केवळ गुणांच्या रूपात मोजता येणारं नाही. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही तू खचली नाहीस, डगमगली नाहीस. दुःख पचवून, संयम आणि मेहनतीच्या जोरावर तू स्वतःचं स्वप्न जपलं आणि ते पूर्णत्वाकडे नेलं. ही जिद्द, ही चिकाटी आणि ही समजुतदारी खरंच वाखाणण्याजोगी आहे. तुझ्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा, अशा शब्दात अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.