Vaishnavi Death Case: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी पोलिसांनी अखेर सासरा राजेंद्र हगवणेला (Rajendra Hagawane) अटक केली आहे. राजेंद्र हगवणेसह फरार असणारा दीर सुशील हगवणे यालाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. दोघांना शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलं असता, 28 मेपर्यंत पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे. तसंच रिमांड कॉपीमध्ये वैष्णवीची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दुसरीकडे पोलीस तपासात काही धक्कादायक गोष्टी उघड होत आहेत. वैष्णवीला शशांकने केली पाईपने मारहाण केल्याचं समोर आलं आहे.
वैष्णवी मृत्यू प्रकरणात 12 जणांच्या साक्ष आतापर्यंत नोंदवल्या आहेत. त्यातच वैष्णवीला शशांकने पाईपने मारहाण केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिसांनी हा पाईप जप्त केला आहे. यानंतर पोलिसांकडून आणखी एका कलम वाढवण्यात आलं आहे. पोलिसांनी शशांकवर IPC 118 (2) कलम लावलं आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशील हगवणे यांनी वापरलेली थार गाडी पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केली आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर दोघेही फरार झाले होते. यादरम्यान MH 12 WH 0404 या थार गाडीमधून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास केली होती. आता याच प्रवासादरम्यान वापरलेली इंडेव्हर गाडी आणि बलेनो ही गाडी पोलीस केव्हा जप्त करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
16 मे रोजी वैष्णवीचा मृत्यू झाला. मात्र राजेंद्र हगवणे दुसऱ्या दिवशी वडगाव मावळमध्ये हॉटेल तांबडा पांढरा याठिकाणी मटणावर ताव मारत होता. 17 मे रोजी हगवणे मित्रांबरोबर वडगाव मावळमध्ये मटणावर ताव मारताना दिसला. हॉटेल तांबडा पांढराचा मालक मोहन भेगडे आणि राजेंद्र हगवणे हे दोघे तालमीतील मित्र आहेत. त्यामुळे हगवणे हॉटेलमध्ये जेवायला आला होता.
परंतु 17 मे रोजी ज्या ठिकाणी हगवणे जेवायला बसला होता त्या रूमला आता बंद ठेवण्यात आलं आहे. ही रूम का बंद करण्यात आली आहे याचं उत्तर या हॉटेल मधील एकाही स्टाफकडे नाही. याशिवाय हगवणे याठिकाणी आला त्याविषयी माहिती देण्यासाठी देखील बंदी घालण्यात आल्याचं एका कर्मचाऱ्याने सांगितलं.
हॉटेल मालक मोहन भेगडे यांच्याशी झी 24 तासच्या प्रतिनिधीकडून फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे आता या हॉटेल मालकाने देखील त्यांना या प्रकरणी मदत केली का असा सवाल उपस्थित होत आहे.